आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद येथील पारद शिवलिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील पळशी रोडवरील श्री पारदेश्वर मंदिरात विशिष्ट संस्कार करून पारद शिवलिंग बनवून गंधकात बसवले आहे. भारतीय रसशास्त्राचा मुख्य स्तंभ पारा आहे. पारदालाच शंभूबीज, हरज, त्रिलोचन, मुकुंद, रुद्रतेज, शिव, रसेश्वर आदी शिवाच्याच नावांनी ओळखले जाते. पारदाला शिवतेज म्हटल्यामुळे पारा आणि पार्वतीचे रज म्हणून गंधकाला मर्दन करून गंधक आणि पार्‍याचे शिवलिंग तयार केले जाते.

प्राचीन काळात मुमुक्षू ऋषी शरीराला दीर्घकाळ टिकवून म्हणजे पिंडशौर्य करून योगाभ्यासाद्वारे परमपद मोक्ष मिळवायचे. योगाभ्यास साधनेत अनेक जण व्याधिग्रस्त व्हायचे. तेव्हा साधकांनी पिंडशौर्य करण्यासाठी अथक प्रयत्नांनंतर पारद हेच साधन मानले. कारण पार्‍यामध्ये देह स्थिर करण्याची अगम्य शक्ती आहे. अनेक क्रियांद्वारे पार्‍यावर 16 संस्कार करून पार्‍याचे शुद्धीकरण करू लागले. त्यासमयी रसशास्त्रतज्ज्ञ आचार्य तयार झाले. नागार्जुन, नंदी, गोविंद भागवताचार्य, गोरक्षनाथ, भैरवानंद, मन्यानभैरव, सोमदेव अशा आचार्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करून रसग्रंथाची निर्मिती केली. अशा या अनेक संस्कारयुक्त अद्भुत, ऐश्वर्यदायी, मोक्षदायी पारद शिवलिंगाच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होऊन तेज प्राप्त होते, पारददर्शनाने मोक्ष मिळतो, असे म्हटले जाते.

म्हणजेच पारद शिवलिंगाचे दर्शन घेण्याने अनेक प्रकारचे लाभ होतात. पारद शिवलिंग दर्शनाने थोडे का होईना पिंडशौर्य करायचे, मन, बुद्धी स्थिर करायची आणि इच्छित साध्य करायचे, याकडे लक्ष न देता आपण भौतिकतेकडे वळतो म्हणूनच सर्वकाही मिळूनही आम्ही रितेच राहतो. पारद शिवलिंगाच्या दर्शनाने चित्तशुद्धी, आत्मशांती आणि पूर्णत्वाची जाणीव होते, असे भाविक सांगतात.
आनंदगुरुजी शास्त्री, औरंगाबाद