आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिवेणी संगमावर वसलेले ‘रामेश्वर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामेश्वर या जळगाव जिल्ह्यातील शिवलिंगाची स्थापना श्रीरामांनी केल्याचे दाखले तापी माहात्म्य, अरण्यकांड व स्कंद पुराणात आढळतात. शिवलिंग स्थापनेनंतर रामाने येथे महिनाभर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते.

वनवासात असताना चित्रकूट पर्वताकडे जाताना राम, सीता व लक्ष्मण यांनी ठिकठिकाणी शिवलिंगांची स्थापना केल्याची नोंद आहे. त्र्यंबकेश्वरहून चित्रकूटला जात असताना या संगमावर थांबून त्यांनी वाळूची पिंड तयार केली. पुढे त्या पिंडीचे काळ्या पाषाणात रूपांतर झाल्याचे बोलले जाते. हे शिवलिंग एक फूट उंच व दोन फूट रुंद आहे. अर्धा फूट आकाराच्या दुसर्‍या शिवलिंगाच्या स्थापनेची नोंद नाही. येथील वास्तव्यात स्नानासाठी केलेले रामकुंड व सीताकुंडाचे अवशेष 100 वर्षांपूर्वी पाहिल्याचे जुनेजाणते सांगतात.

श्रावण महिन्यात मेळा, पौष व माघ महिन्यात संगमावर स्नानासाठी भाविकांची गर्दी होते. सोमवार, नवरात्र, कृष्ण जन्माष्टमीला विविध कार्यक्रम, पितृपक्षात त्रिपिंडी, कालसर्प योग आदी पितृमोक्ष धार्मिक कार्यक्रम येथे होतात. मात्र, अद्याप या मंदिराचे कोणतेही ट्रस्ट नाही.
जळगावपासून 50 किलोमीटरवरील रामेश्वरला ममुराबाद, विदगावमार्गे भोकरहून आठ किलोमीटर कच्च्या रस्त्याने जातात. भुसावळहून यावल विदगावमार्गाने 75 किलोमीटर, चोपड्याहून 12 किलोमीटर, तर धरणगावपासून 15 किलोमीटरवर रामेश्वर आहे.

सन 2000मध्ये जीर्णोद्धार...
अहिल्याबाई होळकर यांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी श्री रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद या ठिकाणी सापडते.
अलीकडे चोपडा येथील स्व. सतीश पंढरीलाल तोतला यांनी पुढाकार घेऊन तसेच जळगावचे श्रीकांत खटोड, राजू बांगर, नरेश खंडेलवाल आदींनी एकत्र येऊन रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले होते. सन 2000मध्ये त्यासाठी मंदिर परिसरात दानपेटी ठेवून भाविकांना जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन केले. जमा झालेला निधी व भाविकांनी स्वत: रक्कम टाकून सभामंडप तयार करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. ईश्वरलाल जैन यांनीही 17 किलो चांदीचे शिवलिंग या मंदिरास भेट दिले आहे.