आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या स्वार्थामधील सत्य जाणा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावना जाणा, माणूस बना

मला जशी भूक लागली आहे, तशीच ती इतरांनाही लागलेली आहे, हे सत्य लक्षात घेऊन एका भाकरीचे चार तुकडे केले आणि वाटून घेतली तर सर्वांचाच स्वार्थ साधला जाईल. याचाच अर्थ असा की, भाकरीमुळे भांडणारे पशू असतात. मात्र, याच्या उलट ‘भूक सगळ्यांना सारखीच असते’ या सत्याची जाणीव होणारा खरा माणूस असतो.
खरे पाहता मानवी जीवनात ‘स्वार्थ’ हे सत्य आहे, हेच दिसून येते. या सत्याकडे डोळेझाक केल्यामुळेच किंवा या सत्याकडे तिरकस नजरेने पाहिल्यामुळेच मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात.
या सत्याकडे आपण डोळेझाक करतो, याचा अर्थ असा की, या सत्याकडे डोळे उघडून पाहण्याची माणसाची हिंमत नसते. तिरकस नजरेने पाहणे म्हणजे, ‘आपण नि:स्वार्थी असून, जगातील लोक स्वार्थी आहेत,’ अशा दृष्टीने सर्वांकडे पाहणे. वस्तुस्थिती अशी आहे की, काही अपवाद सोडल्यास जगातील प्रत्येक माणूस स्वार्थीच असतो. स्वार्थ साधण्याकडेच त्याची सहज प्रवृत्ती असते. इतकेच नव्हे, तर स्वार्थ हा त्याचा स्थायीभाव असतो. स्वार्थ असणे म्हणजे काही जगावेगळे घडणे नव्हे. वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर स्वार्थ ही निसर्गाची सहज प्रेरणा आहे. त्यामुळे माणसात स्वार्थ असण्यात काही गैर नाही, हे ओघाने आलेच. पण, प्रत्यक्षात माणसे या सत्याचा विपर्यास करताना दिसतात.
‘लोक फार स्वार्थी असतात,’ असे आपण नेहमी ऐकतो. यातील विनोद असा की, प्रत्येक माणूस नेमके हेच करत असतो. मग प्रश्न निर्माण होतो की, सत्यता स्वीकारायची कशी? सोपा मार्ग आहे. सर्वच माणसे स्वार्थी आहेत तर सर्वांनी एकमेकांचा स्वार्थ जोपासण्यात सर्वांचेच हित आहे, हे लक्षात ठेवावे.