आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामावतारी श्री समर्थ सदगुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर-श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर या नामावतारी महापुरुषाचा शतसांवत्सरिक पुण्यतिथी महोत्सव मार्गशीर्ष कृष्ण 10 (27 डिसेंबर)ला उत्कट भक्तिभावाने होत आहे. त्यानिमित्ताने चैतन्यस्मरणात सद्गुरुचरणी शब्दसुमनांजली...
गोंदवले या गावी (ता. माण, जि. सातारा) माघ शु. 12 शके 1766 (इ.स. 1845)मध्ये महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासून ध्यानधारणा, भजन-पूजन, अन्नदानाची आवड होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरुशोधार्थ गृहत्याग केला; मात्र वडिलांनी शोधून आणून त्यांचे लग्न लावून दिले. त्यांनी पुन्हा घर सोडले आणि गुरूच्या शोधार्थ देशभ्रमंती केली. अखेर नांदेडजवळील येहेळगावी दत्तभक्त तुकाराम चैतन्यांच्या भेटीने त्यांचे समाधान झाले. त्यांनी महाराजांना ‘ब्रह्मचैतन्य’ नाव दिले. गुरूंच्या आदेशानुसार महाराजांनी नैमिषारण्यात साधना केली, तर मातेच्या आज्ञेने गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. पत्नी कालवश झाल्यानंतर मातेच्या आग्रहास्तव एका अंध मुलीशी दुसरा विवाह करून तिची आध्यात्मिक प्रगती केली. भ्रमंती, प्रबोधन, रामनामजप, गोरक्षण, गोसेवा, जागोजाग राम मंदिरांची स्थापना, अन्नदान असे कार्यक्रम सुरूच ठेवले.
‘काया गुंतवावी प्रपंचात । मन गुंतवावे नामात’
असे त्यांचे सांगणे होते.
1890 पासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत्वे गोंदवले येथेच राहिले. नियमित साधनामार्गातून त्यांनी आबालवृद्धांच्या मनात रामनामाचे बीज पेरले. त्या काळात दोनदा पडलेल्या दुष्काळात त्यांनी हातांना काम देऊन लोकांना जगवले. मुखी राम आणि अन्न देऊन महाराजांनी सगळ्यांचे योगक्षेम वाहिले. प्लेगच्या साथीत अनेकांची सेवा केली.
1897 मध्ये महाराज गाव सोडून निघाले तेव्हा प्रत्यक्ष श्रीरामरायाच्या नेत्रातून त्या प्रसंगी अश्रुपात झाल्याचे महाराजांची भक्तमंडळी सांगतात. त्यामुळे ते पुन्हा परत आले. त्यानंतरही त्यांनी अनेकांना आत्मोद्धाराचा मार्ग सांगितला. 22 डिसेंबर 1913 रोजी त्यांनी श्रीरामरायाचे अखेरचे दर्शन घेतले. सिद्धासन घातले आणि ‘जेथे नाम जेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण,’ असे बोलून महाराजांनी आपला प्राण रामरूपी समर्पित केला.
व्यक्तिमत्त्वाचे आणि बोधाचे चिंतन
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कलियुगातील नामावतारी श्रेष्ठतम विभूती होते. शंकराचा अवतार म्हणजे पवनपुत्र हनुमान आणि दास्यभक्तीचे आचार्य असलेल्या मारुतीरायाचे अवतार म्हणजे सज्जनगडचे रामदास स्वामी. स्वामींचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी रामोपासनेचे, रामनाम भक्तीचा प्रचार
अखिल विश्वात करण्याचे व्रत आजन्म अंगीकारणार्‍ या श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांना समर्थांचा अवतार समजले जाते.
नियमित साधना मार्गातून गोंदवलेकर महाराजांनी लोकांत रामनामाचे बीज पेरले. त्यांच्या काळात दोनदा पडलेल्या दुष्काळात त्यांनी हातांना काम देऊन लोकांना जगवले. अनेक भक्तांना आत्मोद्धाराचा मार्ग सांगितला. मुखी राम आणि अन्न देऊन महाराजांनी सगळ्यांचे योगक्षेम वाहिले.


चिंतनाची, रामनामासह लोककार्याची आवड असलेल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची 27 डिसेंबर रोजी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा.