आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सिद्धराया पाय दोन्ही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीसिद्धेश्वराचे हेमाडपंती मंदिर माचणूर (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे भीमा नदीच्या काठी आहे. पाच दिवस चालणारी येथील यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. पंढरपूर येथून भीमा (चंद्रभागा) पुढे माचणूरच्या दिशेने वाहते. अहिल्याबाई होळकर यांनी नदीकाठच्या बाजूस भव्य घाट बांधला आहे. नदीपात्रात जटाशंकराचे मंदिर, तर वेशीकडील एका बाजूस मल्लिकार्जुन मंदिर आहे. सिद्धेश्वर मंदिराचा गाभारा उत्तरमुखी आहे. प्रवेशद्वार पूर्वमुखी असून, परिसरात ओवर्‍या आहेत. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे.

येथील यात्रेत पहिल्या दिवशी मूर्तीस महारुद्राभिषेक करून पालखी मिरवणूक काढण्यात येते. मंदिरात होणार्‍या पूजेच्या वेळी मोठा नगारा वाजवण्यात येतो. त्याचा मान गावातील मुस्लिम कुटुंबीयांकडे आहे. सर्व धर्म, पंंथांना सोहळ्यात सामावून घेणारे हे प्राचीन शिवमंदिर आहे.

आंध्र प्रदेशातील कोल्लीपाली क्षेत्रात 1100 वर्षांपूर्वी होऊन गेलेले रेणुकाचार्य योगी सत्पुरुष यांचे येथे वास्तव्य होते. ते वीरशैव सिद्धांत स्थापना करणार्‍या शिवाचार्यांतील प्रमुख आचार्य होते. मठाच्या शेजारी औरंगजेब बादशहाचा भुईकोट किल्ला आहे. इस्लामपुरी येथे छावणी स्थापन करून औरंगजेबाने हे शिवमंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. हिंदुस्थानातील बादशाही कोर्टाचे कामकाज, नाणी, पत्रव्यवहार, नेमणुका, बदल्या असे औरंगजेबाचे सर्व व्यवहार येथूनच चालत होते, असाही ऐतिहासिक उल्लेख आहे. येथे असताना औरंगजेबाने श्री सिद्धेश्वराला मांसाचा नैवेद्य पाठवला. मात्र, त्याची फुले झाली, असे परिसरातील भाविक सांगतात. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात येथे विद्युत रोषणाई केली जाते.

अशी आहे आख्यायिका
कड्यातून वाहणार्‍या भीमेच्या काठी वनात पूजा केलेले शिवलिंग सिद्धरामांनी पाहिले. अरण्यात कोणी पूजा केली असेल, याचा शोध घेतला तेव्हा अंबिका माता शिवपूजा करताना दिसली. मातेने सांगितले की, त्रैलोक्यात गौरवले जाणारे ऋषीकाळातील तेजस्वी ज्ञानी वामदेव येथे आले होते. रात्री त्यांनी नदीत शिवलिंग तरंगताना पाहिले. ते पाण्यातून बाहेर काढून त्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी शुक्रदेवासारखे आत्मनिष्ठ जप, तप व योग्यांच्या उपस्थितीत यज्ञकर्म केले. येथे महाशिवरात्रीला पूजा व पालखी सोहळा होतो. येथील यात्रा पाच दिवस चालते. गावातील वेशीच्या दिशेने घाट चढताना उजव्या बाजूस श्री मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे, तर डाव्या बाजूस योगी बाबा महाराज आर्वीकर यांचा मठ आहे.
- विनोद कामतकर, सोलापूर