आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूरचे आराध्‍य दैवत टेकडी गणेश, सचिन तेंडुलकरवर आहे कृपादृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भातील एक प्रसिध्‍द शहर म्‍हणून नागपूरला ओळखले जाते. महाराष्‍ट्राची राजधानी म्‍हणूनही नाग‍पूरचा नावलौकिक आहे. नागपूरला सांस्‍कृतिक, सामाजिक, राजकीय परंपरा आहे. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे मुख्‍यालय नागपूरमध्‍ये आहे. तर डॉ. आंबेडकरांनी धर्मांतरसुध्‍दा नागपूरला केले आहे. संत्रानगरी नावाने प्रसिध्‍द असलेले हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर आहे.
नागपूरचे आराध्‍य दैवत असलेले टेकडी गणपती मंदिर, नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले हे गणपती मंदिर हे नागपुरातील प्राचिन आणि लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे 250 वर्षापूर्वी हे मंदिर बांधले असल्याचे समजते.
नागपूर रेल्वेस्टेशनपासून जवळच व सीताबर्डी किल्ल्याच्या पूर्व उतारावर टेकडी गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर लष्करी निर्बंधित क्षेत्रात असल्याने तेथे पक्के बांधकाम करता येत नाही. हे स्थान भोसलेकालीन असावे, असे जुनेजाणते लोक सांगतात. शुक्रवार तलावाचे पाणी पूर्वी सीताबर्डी किल्ल्यापर्यंत होते व भोसले राजे नावेतून तेथे गणेश दर्शनासाठी येत, असेही सांगितले जाते. येथील गणेशामूर्ती ही भोकरीच्या झाडाखाली उघड्यावर होती. याठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते, परंतु मुस्लिम राजवटीत ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड- पिंपळाची झाडे आहेत, त्यामुळे शीतलता राहते. नवीन नागपूर स्टेशन झाल्यापासून (1922-23) या ठिकाणी दर्शला येणा-या भाविकांची संख्या वाढली आहे.
1924 मध्ये काही अटींवर संरक्षण खात्याने या मंदिराजवळ पत्र्याची खोली बांधण्यास परवानगी दिली. 1948 मध्ये विजेचीही सोय झाली. 1964 मध्ये लष्कराच्या परवानगीनेच मंदिराला कुंपण घालण्यात आले. मात्र आजही तेथे कायमस्वरूपी निवासस्थान बांधण्यास मनाई आहे. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन पाय, चार हात, डोके, सोंड पूर्वी स्पष्ट दिसत असे. मात्र आता शेंदराच्या पुटांमुळे मूर्ती स्पष्ट दिसत नाही. या बैठ्या मूर्तीची उंची साडेचार फूट व रुंदी 3 फूट आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे. आता खासगी ट्रस्ट म्हणून या देवस्थानची नोंदणी करण्यात आली आहे. 1954 मध्ये सल्लागार मंडळही स्थापन झाले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेव्हाही नागपुरला येतो तेव्हा टेकडीच्या गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. या गणेशाची सचिनवर कृपादृष्टी असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, मन प्रसन्न करणाऱ्या टेकडीच्या गणपतीची काही छायाचित्रे...