आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्ती संचयावर नियंत्रण धर्मशास्त्रातील संकल्पना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यजुर्वेदांतर्गत रुद्र सूक्तात मानवाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, अगदी क्षुल्लक मातीपासून हत्तीपर्यंतची मागणी व ती पुरवणारे कारागीर यांची वर्णने आढळून येतात. पण त्यात अतिरिक्त संचय कोठेही आढळून येत नाही. धनसंचय कोणी आणि किती प्रमाणात करावा याचे वर्णनही यात आहे.
कागदी नोट किंवा विशिष्ट धातूपासून तयार केलेले नाणे हे अर्थव्यवहार, वस्तूच्या देवघेवीसाठी निर्माण केलेले एक साधन आहे. राजमुद्रांकित साधन आहे. अर्थशास्त्रज्ञ त्याला विनिमयाचे साधन म्हणतात. आपण सामान्यजन त्याला पैसा, रुपये, चलन असे म्हणतो.
दैनंदिन जीवनातील सर्व व्यवहार या साधनाभोवतीच फिरत असतात आणि त्यात गैर काहीही नाही. अगदी काळाच्या खूप खूप मागे जाऊन या साधनाचा विचार केला तरी सुवर्णमुद्रांच्या रूपाने तर कधी कार्षापणाच्या रूपाने हे साधन अस्तित्वात होते याचे वेद-पुराणादी ग्रंथांतून पुरावे सापडू शकतात. कौटिलीय अर्थशास्त्रात तर त्याचा उघडउघड उल्लेख येतो.
वेदांमध्ये सुवर्णमुद्रांचा जो उल्लेख येतो तोही चलन या अर्थानेच असावा, असे काही विद्वानांचे मत आहे. पण एक मात्र खरे की, आज जी चलनसूज आली आहे ती तेवढ्या प्रमाणात फार पूर्वी नसावी किंवा नव्हती असे दिसते. वस्तुविनिमयच सर्वत्र असावा असे पुरावे सापडतात.
धान्याच्या बदल्यात धान्य ही वस्तुविनिमयाची पद्धत तर अगदी साठसत्तरच्या दशकापर्यंत होती. चार शेळ्यांच्या बदल्यात एक गाय किंवा दोन गायींच्या बदल्यात एक म्हैस असे व्यवहार चालत असत. धान्ये, कडधान्ये, तेलबिया यांचे देवघेव व्यवहारही त्या त्या वस्तूंची आवश्यकता आणि उपयुक्तता जाणूनच केले जात असत.
आपण ज्याला चलन, मुद्रा, नोट, पैसा वगैरे म्हणतो त्याचा फार कमी प्रमाणात उपयोग दैनंदिन व्यवहारात होत असे. महाभारतातील एक संदर्भ आठवला म्हणून सांगतो. प्रसंग उत्तरगोग्रहणाचा आहे. दुर्योधनाने विराट राजाच्या हजारो गायी पळवल्या असा तो प्रसंग. एखाद्या राजाने दुसऱ्या एखाद्या राजाचे गोधन पळवून नेणे हाही एक पराक्रम समजला जात असे.
खरे पाहता विराटाकडे भरपूर प्रमाणात सोने-नाणे असण्याची शक्यता असतानाही व ती लुटून आणण्याएवढे सैन्यबळ दुर्योधनाजवळ असतानाही केवळ तो गायींची खिल्लारेच का पळवतो? याचे उत्तर गोधन या तत्कालीन संकल्पनेत असावे असा तर्क करता येतो.
पशुधन, गोधन आणि भूमिवर्चस्व ह्या संकल्पना त्या काळी प्रतिष्ठेच्या मानल्या जात असाव्यात आणि त्यानुसारच सर्व व्यवहार होत असावेत, असाही तर्क करता येतो. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथांतून, कथांमधून याचे उल्लेख सापडतात. संपत्ती संचयात सोने, हिरे, माणके आदी धातूंचाही उल्लेख येतो .

खरे पाहता संपत्ती संचय करणे, ती वाढवणे, विस्तार करणे ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे व ती सार्वत्रिक व सार्वदेशिक आहे. पण ही भावना प्रबलतम झाली म्हणजे तिला शोषणाचे किंवा "बळी तो कान पिळी'चे स्वरूप प्राप्त होते.
आवश्यकतेच्या कमाल मर्यादा ओलांडल्या की माणसाच्या पतनाला प्रारंभ होतो हे सूत्र लक्षात ठेवले म्हणजे संपत्ती संचयाच्या मूलभूत प्रेरणेला काही प्रमाणात नियंत्रित करता येईल का, असाही विचार धर्मशास्त्रात केलेला आढळून येतो.
यजुर्वेदांतर्गत रुद्र सूक्तात मानवाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, अगदी क्षुल्लक मातीपासून हत्तीपर्यंतची मागणी व ती पुरवणारे कारागीर यांची वर्णने आढळून येतात. पण त्यात अतिरिक्त संचय कोठेही आढळून येत नाही. धनसंचय कोणी आणि किती प्रमाणात करावा याचे वर्णनही आलेले आहे.

माणूस म्हणून जगताना त्याच्या प्राथमिक म्हणून काही गरजा असतात. आपण त्यांना गौण या अर्थाने प्राथमिक नव्हे तर अत्यावश्यक या अर्थाने प्राथमिक समजले पाहिजे. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा या अत्यावश्यक अशाच गरजा आहेत
(कदाचित पृथ्वीला "अवनी' असे त्यासाठीच म्हटले असावे) त्याची पूर्तता होणे किंवा ती करण्यासारखी व्यवस्था निर्माण करणे हे शासन, प्रशासनाचे कार्य आहे. यातूनच मग पुढे वस्तुविनिमयाची व्यवस्था निर्माण झाली असावी. वस्तुत: विशिष्ट धातूच्या अगर कागदासारख्या पदार्थापासून निर्माण केलेल्या राजमुद्रांकित चलनाद्वारे वस्तुविनिमयाची पद्धत फार अलीकडची असावी. सोने, चांदी, हिरे, माणके हे आभूषणासाठीच असावीत असे वाटते आणि त्याचे उल्लेखही त्या संदर्भात अधिक येतात. म्हणून गोधन, पशुधन, भूधन यापेक्षा अधिक महत्त्व त्याला नसावे. याचाही संचय फार प्रमाणात होवू नये, त्याचे केंद्रीकरण होऊ नये अशीही काळजी आपण घेतली पाहिजे.
विरेचनाच्या उपचाराची गरज
लोकांची संपत्तीसंचयाची भूक वाढायला लागली तशीतशी चलनवाढही व्हायला लागली. संपत्ती संचय ही माणसाची मूलभूत प्रेरणा असली तरी तिला नियंत्रित ठेवणेही आवश्यकच असते. विवेक, देशहित, समाजहित ध्यानात घेऊनच त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. तद्वतच अर्थार्जनाचेही आहे. राजेशाही , हुकूमशाही, एकाधिकारशाही या व्यवस्था आता गतार्थ झाल्या आहेत.
लोकशाही आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये संपत्तीसंचयाचे संदर्भच बदलले आहेत. व्यवसाय स्वातंत्र्यामुळे अर्थव्यवस्थेला गतिमानता प्राप्त झाली आहे. हे सर्व कालानुरूप असले तरी माणसांच्या मूलभूत प्रेरणा कधी-कधी अनिवार होतात, चौखुर उधळू लागतात, त्याचेच सहपरिणाम म्हणून भ्रष्टाचार वाढायला लागतो, न्यायान्यायाची चाड उरेनाशी होते. एक प्रकारची अंदाधुंदी माजते.
मग याचे विरेचन होणे आवश्यक होऊन बसते. वैद्यकशास्त्रामध्ये विरेचन ही एक उपचार पद्धती आहे. शरीराच्या अंतर्गत भागात साचलेली घाण काढून टाकणे आवश्यक असते.
रमाकांत लिंबेकर,
परभणी
बातम्या आणखी आहेत...