आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन्य ती वैशाखी पौर्णिमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाखी पौर्णिमा बौद्ध धम्मात अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याचदिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, संबोधी प्राप्त झाली आणि महापरिनिर्वाणही झाले. सोमवारी (दि. ४) येणाऱ्या वैैशाखी पौर्णिमेनिमित्त...

संपूर्ण विश्वाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी तथागत बुद्धांचा जन्म लुंबिनी वनात महाराणी महामाया यांच्या पाेटी वैशाख पाैर्णिमेला झाला. त्यांचे वडील कपिलवस्तू नगरीचे राजा शुद्धाेधन हाेते. राजपुत्राला अभिप्रेत असलेले सर्व प्रकारचे शिक्षण सिद्धार्थने ग्रहण केले हाेते. धनुर्विद्या व इतर शास्त्रात ताे पारंगत झाला हाेता. पण, तरीही िसद्धार्थ निरूपद्रवी प्राण्याची शिकार करण्यास नकार देत हाेता. सिद्धार्थला वाटायचे, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा हाेऊ शकताे? याउलट सिद्धार्थ गाैतमाला ध्यानधारणेचा ध्यास लागला होता. तो मित्रांनाही तसाच उपदेश करीत असे. याेग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत हाेते, यावर सिद्धार्थचा विश्वास हाेता.

शाक्य व काेलीय या दाेन कुळांमध्ये राेहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाला. शाक्य व काेलीय यांच्यात युद्धाचा प्रसंग अाेढवला. काेलियांचा उपद्रव थांबविण्यासाठी त्यांना शासन केले पाहिजे, असे शाक्याचे सेनापती म्हणाले. या प्रस्तावावर सिद्धार्थ म्हणाला की, शाक्य-काेलीय यांचा निकटचा संबंध अाहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. वैराने वैर नष्ट हाेत नाही. वैरावर प्रेमानेच मात केली पाहिजे. मात्र, त्याच्या या भूमिकेला विरोध झाल्यामुळे त्याने मानवकल्याणाचा व शांतीचा व दु:खमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी देशत्यागाचा निर्णय घेतला. वयाच्या २९व्या वर्षी सिद्धार्थने अाईवडील, पत्नी यांची परवानगी घेऊन रितसर गृहत्याग केला. काही अंतरावर गेल्यावर त्यांनी अंगातील राजेशाही पेहराव काढून ठेवला. केवळ दाेन दुपट्टे अंगावर ठेवले. जंगलात मिळेल त्यावर गुजराण करू लागला. वैदिक ऋषींकडील तत्त्वज्ञान, अालार कालाम तसेच उद्दक रामपुत्राच्या अाश्रमात त्यांच्याकडील तत्त्वज्ञान मिळवले. मात्र, त्यांच्याकडूनही समाधान न झाल्यावर अाश्रम साेडून सत्याच्या शाेधासाठी सिद्धार्थ जंगलात गेला. अन्न, पाणी त्यागून खडतर तप करूनही त्याच्या हाती काही आले नाही. तेव्हा त्याने साधनेचा मध्यम मार्ग निवडला आणि वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गाैतम सम्यक संबुद्ध झाला. बुद्धाने मानवाच्या दु:खमुक्तीचा मार्ग शाेधून काढला.

बुद्धत्व प्राप्त झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी सारनाथ येथील ऋषिपतन मृगदावनात पहिला धम्मोपदेश हा काैंडिल्य, वप्प, भद्दीय, महानामा व अश्वजित या पाच भिक्षूंना केला. मनातील सर्व विकल्प व भ्रम नष्ट हाेऊन खरा जीवनमार्ग सापडल्याचा त्यांना अत्यानंद झाला. ते त्वरित तथागत बुद्धांचे अनुयायी बनले. त्यावेळी बुद्ध हे या पाच शिष्यांचे गुरू म्हणून सर्व जगाला माहीत झाले. तेव्हापासून अाषाढी पाैर्णिमा गुरुपाैर्णिमा म्हणून मानण्यास सुरुवात झाली. या एेतिहासिक उपदेशाला ‘धम्मचक्क पवत्तन’ संबाेधतात. या घटनेची स्मृती कायम राहावी म्हणून सम्राट अशाेकाने सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन स्तंभ उभारला. तोच अशाेकस्तंभ.
माणूस अाणि माणसाचे माणसाशी नाते हा धम्माचा केंद्रबिंदू अाहे. जगातील सर्वांचे मानवीय जीवन सुखमय करण्यासाठी तथागताने प्रज्ञा, करुणा, समता सांगितली.

तथागतांनी तत्त्वज्ञानात वर्तमानाचा विचार मांडला अाहे. पंचशील, अष्टांग मार्ग अाणि दहा पारमितांवर धम्माला अधिष्ठित केले. शांती, अहिंसा, मैत्री, न्याय शिकविला. समता, स्वातंत्र्य, बंधूता यांचा उपदेश केला. धम्म हा तथागतांचा एक शाेध हाेता. धम्म म्हणजे पृथ्वीवरील मानवी जीवनाचे सर्वात सुंदर चिंतन अाहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेताे. त्याच्या क्रिया-प्रक्रिया अाणि इतिहास व परंपरा यामुळे त्यांना मिळालेले विशिष्ट वळण यावरील संशाेधनाचा परिणाम म्हणजे बुद्धांचा धम्म होय.
संयमित जीवनच माेठा यज्ञ
बुद्धांचा धम्म हा विचार व अनुभवावर अाधारलेला अाहे. विचाराला पटत नाही, अनुभवांशी जुळत नाही, तरी अापले म्हणणे अंधश्रद्धेने मानावे याला तथागतांचा विरोध आहे. संयमित जीवनच सर्वात माेठा यज्ञ अाहे व सत्याचा शाेध लावणे अाणि ते जीवनात रुजवणे सर्वात माेठे पुण्य अाहे, असे ते सांगतात.
{भाऊराव बा. बागडे, बाेरगाव मंजू (जि. अकाेला)