आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धन, तरीही धन्य कसा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुराणे, महाकाव्ये वाचताना अनेकदा मनाचा गोंधळ होतो. माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींना तर सारे अजबच वाटते. अगदी अविश्वासार्ह वाटते. ही पिढी ‘थेट भिडणारी’ आहे आणि आपले पुरातन साहित्य रूपकांचा भरपूर वापर करणारे आहे. आमच्या एका अभ्यासवर्गात एक मुलगी खूप तावातावाने म्हणाली, ‘आपल्या पूर्वजांनी ‘स्त्री’ला काय बाजारची वस्तू समजले होते काय?’ तिला स्मृतिकार मनुंचा राग आला होता. ‘न स्त्री स्वातंत्रं अर्हति।’ मनुच्या या विधानावर ती तुटून पडली होती. मी म्हटले, ‘याचा तू जसा अर्थ लावलास तसाच मनुच्याही मनात असेल तर मीही चार शिव्या मनुला घालतो. पण मला वाटते, मनुला तसे म्हणायचे नसावे.’ स्वातंत्र्य या शब्दाचा सध्या जसा अर्थ सर्वांच्या मनात आहे (आणि तो आज बरोबरच आहे) ती कल्पना मनुच्या काळात असण्याची शक्यताच नाही. ‘स्व’च्या लहरीप्रमाणे जगणे, वागणे म्हणजे स्वातंत्र्य असाच त्या वेळी अर्थ घेतला जात असे. लहानपणी बाप, तरुणपणी नवरा, वृद्धपणी मुलगा यांच्या आधाराने स्त्री तेव्हा राहात होती. ‘मनात येईल तसे ती वागू शकत नाही’ असाच ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति’चा अर्थ होतो.

मी म्हणत होतो ते तिला चटकन स्वीकारता येत नव्हते. दोष तिचा नाही. बदलत जाणार्‍या संकल्पनांचा, शब्दांच्या बदलत्या अर्थाचा विचार केला की काय गडबड आहे लक्षात येते. आपल्याला वाटते त्याच अर्थाने स्त्री स्वतंत्र नसती तर स्त्रीच्या विचारांना, पुरुष ऋषींच्या विचारांच्या बरोबरीने ऋग्वेदात स्थान मिळाले नसते. कक्षीवानाची मुलगी घोषा, विश्ववारा, इंद्राणी, अपाला, लोपामुद्रा, सूर्या, यमी, गीधा, र्शद्धा, उर्वशी यांची सूक्ते, ऋचा वेदात आहेत. अभ्यासवर्गात मी ही माहिती दिली तेव्हा मुले विचार करू लागली. अपेक्षितही तेच होते.

मी विचारले, ‘पुत्रिणा तु कुमारिणा विश्वमायुर्व्यर्शुत: उभाहिरण्यपेक्षप्ता’ याचा अर्थ काय सांगा बरे! मीच अर्थ सांगितला. पित्याच्या दीर्घायुष्याला त्याची गुणी मुलगी कारण असते, असा अर्थ आहे. मनु वैवस्तांचे हे मत आहे. मग आणखी प्रश्न आले. ‘स्त्रीला अबला का म्हणायचे?’ यावर चर्चा झाली. वेदात एकाही ठिकाणी स्त्रीला अबला म्हटले नाही. उलट ‘नारी’ म्हटले आहे. नारी म्हणजे नेतृत्वगुणाने परिपूर्ण, दानी आणि वीर स्त्री! आपण ‘महिला’ म्हणतो. पण अर्थ काय त्याचा? ‘मह् + इलत् + आ’ अशी व्युत्पत्ती आहे आणि अर्थ आहे, पूज्य, आदरणीय! अशा संबोधनातून, विशेष नामातून इतिहास आपल्याशी बोलत असतो, अर्थातच् आपण ऐकणार असू तर!

दोष मुलांचा नाही. काळ बदलतो, अर्थ बदलतो संदर्भही बदलतो हेच खरे! पूर्वी ‘विवाहास’ ‘शरीर संबंध’ म्हटले जायचे आणि थेट लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत हा शब्द वापरला जायचा! आता हे ऐकूनही हसू येते. पण आपले पुराण-महाकाव्यादी साहित्य वाचताना हे तारतम्य बाळगायला हवे, हेच खरे! तरीही मनात गोंधळ उठतो. आता हेच बघा ना- ‘सकलभुवनमध्ये निर्धनास्ते2पि’ धन्या।’ हे चरण वाचून मीही उडालो. निर्धन तरी धन्य कसा, असा प्रश्न मनात उभा झाला. कारण ‘निर्धन’ शब्दाचा अर्थ ‘दरिद्री’ असाचा मी घेत होतो. पण पुढच्या चरणाने अर्थ बदलतो. पुढचे चरण म्हणते, ‘निवसति हृदि येषां र्शीहरेर्भक्तिरेका।’ म्हणजे एका हरिभक्तीशिवाय ज्याच्या हृदयात दुसर्‍या कशाचीच आसक्ती नाही तो जगात धन्य आहे. ‘निर्धन म्हणजे धनाची आसक्ती नसलेला’ असा अर्थ होतो. अनासक्ताशिवाय दुसरा कोण धन्य असेल?

प्रपंचाची, लौकिकाची आसक्ती नसणार्‍याला परमार्थात गरीब मानले जाते. ‘श्रीमंतीला’ शोभणारे सारे त्याच्याजवळ असूनही त्याचे मन हरिप्रेमाने भरलेले असते. मनात संसाराची श्रीमंती भरलेली असेल तर तिथे कृष्णाला जागा कशी असणार? लक्षात घेतले पाहिजे की, परमार्थातील ही ‘गरिबी’ फार ‘ऐश्वर्यवान’ अवस्था आहे. वृंदावनातील एका संताने फार छान शब्दात हा भाव व्यक्त केला आहे, ते म्हणतात-
‘कृपा की न होती तो आदत तुम्हारी।
तो सुनी ही रहती अदालत तुम्हारी।।
गरिबों के दिल में जगह तुम न पाते।
तो किस दिल में होती हिफाजत तुम्हारी।।’

देवाची ‘हिफाजत’, देवाचा सांभाळ करणारे गरिबाचे ‘हृदय’ खरेच गरीब असेल काय? ते धन्यच असेल. परम धन्य असेल. अशी धन्यता मिळवणे हाच खरा परमार्थ आहे. देवाच्या आश्रयाला जाणार्‍यांपेक्षा देवाला आश्रय देणाराच खरा धन्य होय!