आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकृष्णांची साधना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रामकृष्ण परमहंस पश्चिम बंगालमधील विद्वान संत होते. लहानपणापासूनच त्यांनी कालिमातेची भक्ती केली. त्यांच्या अपार भक्तीमुळेच कालिमाता त्यांना प्रसन्न झालेली होती. हिंदू धर्माचा प्रसार विश्वात करणारे स्वामी विवेकांनद त्यांचे शिष्य होते. रामकृष्णांकडून विवेकानंदांनी अध्यात्मावर मोठे ज्ञान प्राप्त करून घेतले. अशा महान व्यक्तित्वाबद्दल असे सांगण्यात येते की, रामकृष्ण परमहंसांकडे लोक आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी येत असत. तेही सर्वांच्या शंका ऐकून तितक्याच आपुलकीने मार्गदर्शन करत. सोप्या सोप्या उदाहरणाने ते लोकांना पटवून देत. कोणीही व्यक्ती त्यांच्याकडून निराश होऊन गेलेली नाही. एकदा त्यांना भेटण्यास एक व्यक्ती आली, ती अस्वस्थ वाटत होती. रामकृष्णांनी त्याला मोकळेपणाने आपली समस्या मांडण्यास सांगितले. तो म्हणाला, स्वामीजी, मी माझ्या प्रापंचिक अडचणी सोडवण्यात इतका अडकलो आहे की, मला परमेश्वराचे नामस्मरण करण्यासही वेळ मिळत नाही. यामुळे मला अवघडल्यासारखे वाटते. मला असा मार्ग सांगा, ज्यायोगे मी प्रपंच सांभाळून परमेश्वराची प्रार्थना करू शकतो. रामकृष्ण हसून म्हणाले, एखाद्या खेडूत महिलेला कांडताना पाहिलेस का? ती एका हाताने कांडत असते आणि दुसर्‍या हाताने मुलाला दूधही पाजते. त्याच वेळी एखादा ग्राहक वस्तू खरेदी करण्यास आला, तर त्याचा हिशेबही करते. याबरोबरच शेजारी महिलेशी बोलतही असते. या सगळ्या कामात तिचे मूळ कार्य चालूच असते. तिचे लक्ष आपल्या उखळ आणि मुसळीकडेच असते, कारण तिला माहिती आहे की, थोडेही लक्ष विचलित झाले, तर मुसळात हात ठेचून निघेल. या खेडूत महिलेप्रमाणेच आपली प्रापंचिक कार्ये करण्याबरोबरच परमेश्वराची प्रार्थना केलीच पाहिजे. त्यासाठी वेगळा वेळ मिळत नाही, ही तक्रार नव्हे. आपल्या जबाबदार्‍या पार पाडताना परमेश्वराचे स्मरण करूनच कामास सुरुवात करावी. हीच खरी परमेश्वराची भक्ती आहे. कर्म करताना समर्पण वृत्ती असणेच सर्वश्रेष्ठ आराधना आहे.