आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते मनाशी जोडा, सर्वांशी जुळेल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक शिक्षण आणि जीवनशैली अशी आहे की त्यामुळे बुद्धीचा विकास तर झाला, पण हृदय उपेक्षित राहिले. प्रत्येक विचारात, प्रत्येक कामात मेंदूने सर्वांवर ताबा मिळवलेला असतो. यामुळेच लोक नेहमी तणावाखाली असतात, त्रासलेले असतात. रात्री शांत झोपही लागत नाही. कारण झोपेतही मेंदू सक्रियच असतो. झोपेच्या पातळ पडद्याआड मनाची उलथापालथ सुरूच असते.

समाजात हिंसा व विकृती वाढण्याचे एक कारण असेही आहे की, भावनांच्या विकासासाठी कोणतेही शिक्षण, कोणताही उपचार नसतो. बुद्धीचे प्रशिक्षण तर खूप असते. भावनांचे तसे काहीही प्रशिक्षण नसते. ज्याप्रमाणे इंटेलिजन्स कोशेंट म्हणजे ‘आयक्यू’ तपासला जातो त्याप्रमाणे ‘ईक्यू’ म्हणजे इमोशनल कोशेंट तपासण्याची एखादी पद्धत आहे का? हृदय हे भावनांचे स्रोत असते. जर तुम्ही स्वत:च्या हृदयाशी रोज संपर्क साधत असाल, तर तुम्ही एका अनोख्या दुनियेत पोहोचाल. तेथे अशांततेला थारा नाही. जगातील सर्व उपद्रव तेथे व्यर्थ भासतात. हृदय हे शांततेचा नैसर्गिक स्रोत आहे. हृदयावर लक्ष केंद्रित केल्याने आपण त्या स्रोताकडे वळतो, ज्याचे अस्तित्व सदैव असूनही त्याकडे कोणाचे लक्ष नसते.

डोळे बंद करून 10 मिनिटे शांत बसा. हृदयावर लक्ष केंद्रित करा. हृदयात शांतता व्यापून असल्याचे समजा. काही क्षणातच हृदयात नवे जीवन निर्माण होत असल्याचे जाणवेल. एका जलाशयात तरंगत असल्याचा भास होईल. ही भावना गाढ होईल तेव्हा डोळे उघडा. जग अगदी वेगळेच असल्याचे भासेल. कारण शांतता तुमच्या डोळ्यातून पाझरत असेल. लोकांची तुमच्याशी वागणूक बदलल्याचे जाणवेल. लोक अधिक प्रेमळ आणि नम्र होतील. तुमच्यात एक चुंबकत्व तयार झाल्याचे तुम्हास जाणवणारही नाही. शांत व्यक्तीच्या सभोवती एक आभा असते. तुम्ही त्रासलेले असाल, तेव्हा सगळे तुमच्यापासून दूर पळतात. तुम्ही शांत असता, तेव्हा सगळे तुमच्या जवळ येतात. जे तुमच्या जवळ येतात, त्यांना शांततेचा अनुभव येतो. अगदी वाळवंटातून चालत आलेला वाटसरू डेरेदार झाडाच्या सावलीत आराम करतो, तसाच.

अमृत साधना
ओशो मेडीटेशन व्यवस्थापन सदस्य, पुणे