आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च करा स्वत:च्या जीवनाचा उद्धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:ची बुद्धी हीच माणसाचा मित्र आणि शत्रूही आहे. दु:खी, भकास जीवनातून बाहेर पडत सुखी, पूर्णतेचं, कृतकृत्य जीवन जगायचं असेल तर स्वत:च उद्धार करावा लागेल.

भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात,

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धु: आत्मैव रिपुरात्मन:।।


या श्लोकात भगवान प्रत्येक जिवाला ‘स्वत:च्या जीवनाचा उद्धार स्वत:च करावा’, हे सांगतात. बाहेरून कोणी जीवनात येईल आणि आपल्या डोक्यावर हात ठेवून आपला उद्धार करेल, ही अपेक्षा ठेवू नये. स्वत:चा उद्धार स्वत:च केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला दुर्मिळ विवेकशक्ती दिलेली आहे.

आत्मैव ह्यात्मनो बन्धु: आत्मैव रिपुरात्मन:।।

स्वत:ची बुद्धी हीच माणसाचा मित्र आणि शत्रूही आहे. आजचं जीवन दु:खी, भकास असेल आणि यातून बाहेर पडायचं असेल, सुखी, पूर्णतेचं, कृतकृत्य जीवन जगायचं असेल तर स्वत:चा उद्धार करावा लागेल. त्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिला जातो.

समजा, आपल्याला एखादी शारीरिक व्याधी झाली आहे, असह्य वेदना होत आहेत. अशा वेळी या वेदनांमधून मुक्त होऊन पुन्हा पूर्वीचे आरोग्य मिळवायचे असेल तर योग्य डॉक्टरांकडे गेले पाहिजे. डॉक्टर रोगाचे निदान करण्यासाठी परीक्षा करतात. परीक्षा न करताच त्यांनी लक्षण पाहून औषध दिलं तर त्याने तात्पुरते बरे वाटेल; पण रोगाचा पूर्ण नाश होणार नाही, आरोग्य मिळणार नाही.

शारीरिक व्याधींसाठी डॉक्टर औषध देतीलही, पण आपला हा रोग मानसिक-भवरोग आहे. असा रोग अस्वस्थ, निराश करतो. या रोगाचे निदान केले पाहिजे म्हणूनच आपल्याला बुद्धी दिली आहे. त्याचा वापर कसा करावा, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.

आपलं सर्वांचं जीवन ताणतणावानं असह्य झालं आहे, कारण आपण मनाचा दुरुपयोग करून जीवनाचं अध:पतन, दुर्दशा केलेली आहे. त्यामुळे माणसाचा शत्रू बाहेर नाही तर त्याचे मन, अविवेकी, भ्रष्ट बुद्धीच त्याच्या अध:पतनाला कारण आहे.

यातून स्वत:चे उत्क्रमण करायचे असेल, मानसिक जंजाळातून मुक्त होऊन आनंदी, सुखी जीवन जगायचे असेल तर उपायही तुमच्या आतच आहे. विवेकबुद्धीच तुम्हाला वेदनामुक्त करणारा मित्र आहे. म्हणून सर्मथ पुन्हा पुन्हा विनवतात, विचारी मना तूचि शोधोनि पाहे। आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे. केव्हाही मृत्यूरूपी शत्रू येईल.

घटका गेली पळे गेली तास वाजे घणाणा।
आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणाना।।

जीवन दुर्लभ आहे. त्याचे महत्त्व समजावून घेऊन दु:खाच्या पलीकडे जाण्यासाठी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. हाच माणसाचा पुरुषार्थ आहे. ‘विवेक’च माणसाचा खरा मित्र आहे.