आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपली चूक शोधण्याचा प्रयत्न करा, सापडेलच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोक विचारतात की, चूक नसतानाही कुणी अपमान केला तर त्याच्याशी कसे वागावे? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येतो. मात्र, हा प्रश्नच चुकीचा आहे. आपल्याला स्वत:ची चूक पाहायची नसते म्हणून आपण इतरांना दोष देतो. अनेकदा जशास तसे वागू लागतो. दगडफेक करतो. हे चूक आहे. असा बदला घेतल्याने समस्येचे निराकरण होत नाही. नुसता दगडांचा ढीग जमा होतो.

कुणी आपला अपमान केला तर त्याचे अनेक पैलू असू शकतात. बहुधा त्याला अपमान करायचा नसेल व त्याला समजून घेण्यात आपलीच गल्लत होत असेल. जास्त मानसन्मानाची इच्छा असणार्‍या लोकांना अपमानाची जाणीव लवकर होते. त्यांचा अहंकार फुग्यासारखा असल्याने टोला तर बसतोच. कुणीही आपला अहंकार फुगवण्यासाठी रिकामे नाही. प्रत्येक जण आपापला अहंकार फुगवण्यात व्यग्र असतो. समजा कुणी अपमानजनक वागत असेल आणि आपणही तसेच वागलात तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याला कुठल्यातरी वेडाने झपाटले आहे. त्या क्षणी शांतपणे ऐकणेच योग्य ठरेल. त्याला म्हणावे की, थोड्या वेळानंतर आपण शांत झाल्यावर मी बोलेन. एखादी व्यक्ती रागात असेल तर तिच्या मनातील खळबळीचा निचरा होऊद्या. वादळ आल्यावर आपण त्याच्याशी झगडत बसत नाही, तर त्याला वाट करून देतो. आपण शांतपणे उत्तर दिलेत तर तो चकित होईल. त्याचा राग शांत होईल.

दुसरे म्हणजे नि:पक्षपातीपणे आपली चूक पाहण्याचा प्रयत्न करा, ती सापडेलच. ‘माझे बरोबर, तुमचे चूक’ हे सर्व भांडणांचे मूळ असते. हा वाद अंतहीन आहे. आपली चूक मान्य न करणे हा अहंकाराचा स्वभाव असतो. त्यासाठी थोडा वेळ शांतपणे डोळे बंद करून बसा आणि मनाचे पापुद्रे उलगडा. आपली चूक दिसली तर त्या व्यक्तीचे आभार माना. मनाच्या अंधारात प्रकाशाचा एक किरण आला. असेच हळूहळू मन नितळ होईल, समज वाढेल.
अमृत साधना, ओशो मेडिटेशन रिसॉर्टमध्ये मॅनेजमेंट सदस्य, पुणे.