आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवित्रतेद्वारे सुरक्षित समाजाकडे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याचेच दिवस होते. सकाळपासून पाऊस थांबला होता. केव्हापासून घरात दडी मारून बसलेली बालगोपाळ मंडळी घराबाहेर येऊन चिखल, पाण्यात खेळत होती. एका डबक्यासमोर बसून एक लहानगा त्यातील संथपणे विहार करणार्‍या माशांकडे टक लावून पाहात होता. माशाला पोहण्याचा आनंद आणि लहानग्याला त्याकडे बघण्याचा आनंद येत होता. मात्र, मुलाला तो मासा पकडण्याची इच्छा झाली. त्याने डबक्यात हात घातला आणि पाणी गढूळ झाले. जणू त्या माशाचे अस्तित्वच नाहीसे झाले. शोधूनही तो मासा न आढळल्याने मुलगा रडू लागला. हे दृष्य पाहताना मलाही माझे बालपण आठवले. माझ्या आतापर्यंतच्या जीवनावर एक धावती नजर मी टाकली. येऊन पोहोचलो ते आजच्या कित्येक बिकट परिस्थितींनी ग्रासलेल्या समाजाच्या वातावरणात. मनात आले, माणसाचे जीवनदेखील असेच झालेले नाही का? दु:ख अशांततेने गढूळ झालेल्या वातावरणात मनुष्याचे व्यक्तिमत्त्व हरवून गेले आहे. तो गुदमरू लागला आहे. शोधूनही हाताशी काही येत नसल्याने माणूस रडकुंडीला आला आहे. जीवनाच्या ज्या सौंदर्यात सुख, शांती, आनंद, पवित्रता, संपन्नता असते ते कुठेतरी दडी मारून बसले आहे.

माणूस आज कित्येक शंका-कुशंका, मान-अपमान, भविष्याबद्दल अनभिज्ञता अशा विविध प्रश्नांचे काहूर माजवलेल्या जाळ्यात अडकून उंच भरारी मारण्यासाठी पंख फडफडवत असताना भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकवून आपली प्रतिष्ठा गमावून बसला आहे. जीवनाला सुंदर आकार देण्याची आपली संकल्पनाच कोलमडून गेली आहे.

कोणत्याही धर्माचा माणूस आपल्या धर्माचे व्यवस्थित पालन करीत नसल्याने या सर्व अडचणी त्याच्या समोर येत आहेत. स्वाभिमानाऐवजी तो अभिमानाने जगत आहे. अभिमान म्हणजे स्वत:ला देह समजणे. देह म्हणजेच शरीर समजण्याने मग देहाचे धर्म, संबंध, पदार्थ, वस्तू व्यक्तिविशेष सर्वच काही ध्यानी आल्याने तन, धन आणि पदाचा गर्व मान उंच करू लागतो. या सर्व गोष्टी विनाशी असल्याने गर्वहरण होते. देहाचा अभिमान हा आत्माभिनाने काढावा लागतो. आत्माभिमान म्हणजे आत्मिक स्मृतीत राहून प्रत्येक काम करणे. त्यासाठी आवश्यक आहे मन आणि शरीर या दोन्हींची पवित्रता. म्हणजेच मन-वचन-क्रम-संबंध-संपर्क यांच्यामध्ये स्वच्छता. जिथे पवित्रता, स्वच्छता आहे तिथे सुख, शांती, आनंद, संपत्ती, संपन्नता असते. कारण पवित्रता हीच सुख, शांतीची जननी आहे. पवित्रतेची शक्ती विकारी वैमनस्याला हाणून पाडते, विकृतींवर विजय मिळवून देते.