जगामध्ये सेक्स चेंजची / जगामध्ये सेक्स चेंजची पहिली घटना 5000 वर्षांपूर्वी महाभारतामध्ये घडली होती

Nov 03,2017 10:09:00 AM IST
महाभारताची कथा अनेक पात्रांच्या अवतीभवती फिरताना दिसते. यामधील काही पात्र अगदी विचित्र आहेत. विचित्र यामुळे कारण यांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या प्रवसात अनेक रोचक किस्से आहेत. असेच एक पत्र शिखंडीचे आहे. शिखंडीच्या संदर्भात अनेक लोकांना हे माहिती आहे की, तो स्त्री नव्हता आणि पुरुषही नव्हता. भीष्म पितामह यांच्या मृत्यूचे मुख्य कारण तोच होता. स्त्री रुपात जन्म घेऊन शिखंडी पुरुष कसा झाला, ही कथा या प्रकारे आहे...
पितामह भीष्म यांनी सांगितले रहस्य - पांडव आणि कौरावांचे सैन्य युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्रावर सज्ज झाले होते. पांडवांच्या सैन्याचा सेनापती धृष्टद्युम्न तर कौरवांच्या सैन्याचे सेनापती पितामह भीष्म होते. युद्ध काळात पितामह भीष्म दुर्योधनाला पांडवांच्या सैन्याची माहिती देत होते. तेव्हा त्यांनी द्रुपद राजाचा मुलगा शिखंडीसोबत युद्ध करण्यास नकार दिला. दुर्योधनाने शिखंडीसोबत युद्ध न करण्याचे कारण विचारले. तेव्हा पितामह भीष्म यांनी सांगितले की, पूर्व जन्मात शिखंडी एक स्त्री होता. तसेच या जन्मातही शिखंडी कन्या रुपात जन्मला, परंतु नंतर तो पुरुष बनला. शिखंडीने कन्या रुपात जन्म घेतला असल्यामुळे मी त्याच्यासोबत युद्ध करू शकत नाही. शिखंडी स्त्रीपासून पुरुष कसा बनला, ही विचित्र कथाही भीष्मांनी दुर्योधनाला सांगितली.शिखंडीच्या पूर्वजन्माची कथा - दुर्योधनाने विचारल्यानंतर पितामह भीष्मांनी शिखंडीच्या पूर्वजन्म आणि स्त्रीपासून पुरुष बनल्याची विचित्र कथा दुर्योधनाला सांगितली. भीष्मांनी सांगितले की, ज्यावेळी हस्तिनापूरचा राजा माझा छोटा भाऊ विचित्रवीर्य होता. त्यांच्या विवाहासाठी मी काशी नरेशच्या तिन्ही मुली अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना स्वयंवरात जिंकून हस्तिनापुराला घेऊन आलो. परंतु अंबाच्या मनामध्ये शाल्व राजाबद्दल प्रेम होते. हे समजल्यानंतर त्यांना सन्मानाने शाल्व राजाकडे पाठवण्यात आले. परंतु राजा शाल्वने अंबाचा स्वीकार केला नाही. त्यानंतर अंबाला या सर्व घटनेमागे मी कारणीभूत आहे असे वाटले. यामुळे तिने माझा बदला घेण्याचा निश्चय केला. ही गोष्ट जेव्हा अंबाने आजोबा राजर्षी होत्रवाहन यांना सांगितली तेव्हा त्यांनी अंबाला माझे गुरु परशुरामांकडे जाण्यास सांगितले. भगवान परशुरामांना सर्व घटना सांगितल्यानंतर गुरु परशुराम माझ्याकडे आले आणि मला अंबासोबत लग्न करण्यास सांगितले. परंतु मी या लग्नाला वरोध केला.परशुराम आणि भीष्म यांच्यामध्ये झाले भयंकर युद्ध - मी अंबासोबत लग्न करण्यास नकार दिल्यानंतर परशुरामांना खूप राग आला आणि त्यांनी माझ्यासोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. गुरु परशुराम आणि माझ्यामध्ये सलग 23 दिवस युद्ध चालू होते, परंतु कोणताच निर्णय लागत नव्हता. 24व्या दिवशी मी गुरु परशुरामांवर महाभयंकर प्रस्वापास्त्र अस्त्राचा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आकाशात उपस्थित असलेल्या नारदमुनींनी मला थांबवले. त्यानंतर मी ते अस्त्र धनुष्यावरून उतरवले. हे पाहून परशुराम म्हणाले की, भीष्म तू मला पराभूत केलेस. तेवढ्यात तेथे गुरु परशुरामांचे पितर गण उपस्थित झाले आणि त्यांच्या सांगण्यावरून पराशुरामांनी अस्त्र खाली ठेवले. अशाप्रकारे युद्ध समाप्त झाले. त्यानंतर अंबा माझा सर्वनाश करण्यासाठी तपश्चर्या करू लागली.बदला घेण्यासाठी अंबाने केले तप - पितामह भीष्मांनी दुर्योधनाला सांगितले की, बदला घेण्यासाठी अंबा यमुना नदीच्या काठावर तप करू लागली. तपश्चर्या करताना तिने आपल्या शरीराचा त्याग केला. पुढील जन्मात तिने वत्सदेशाच्या राजाकडे कन्या रुपात जन्म घेतला. या जन्मातही तिला पूर्वजन्मातील सर्व गोष्टी ज्ञात होत्या. यामुळे बदल्याच्या भावनेने ती पुन्हा तपश्चर्या करू लागली. महादेव तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि तिला वरदान मागण्यास सांगितले. त्या मुलीने महादेवाकडे त्यांच्याच पराभवाचे वरदान मागितले. महादेवाने तिला हवे असलेले वरदान दिले. तेव्हा ती मुलगी महादेवाला म्हणाली की, मी एक मुलगी असताना भीष्माचा वध कसा करू शकेल? तेव्हा महादेवाने तिला सांगितले की, पुढील जन्मात तू कन्या रुपात जन्म घेशील परंतु तरुण झाल्यानंतर तू पुरुषात रुपांतरीत होऊन भीष्माच्या मृत्यूचे कारण ठरशील. वरदान मिळाल्यानंतर त्या मुलीने एक चिता बनवली आणि मी भीष्माचा वध करण्यासाठी अग्नीमध्ये प्रवेश करते असे म्हणून त्यामध्ये समाविष्ट झाली.कोणत्या रुपात अंबाने घेतला जन्म - पितामह भीष्मांनी दुर्योधनाला सांगितले की, अंबाने या जन्मात शिखंडी रुपात जन्म घेतला आहे. राजा द्रुपदला कोणतेही आपत्य होत नसल्यामुळे त्यांनी महादेवाला प्रसन्न करून पुत्र प्राप्तीचे वरदान मागितले होते. तेव्हा महादेवाने द्रुपद राजाला सांगितले की, तुझ्या घरी एका मुलीचा जन्म होईल, जी काही काळानंतर पुरुषामध्ये रुपांतरीत होईल. काही काळानंतर द्रुपद राजाच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. महादेवाच्या वरदानामुळे द्रुपद राजाने सर्वांना मुलगा झाला असे सांगितले. तरुण झाल्यानंतर राणीने राजा द्रुपदला सांगितले की, महादेवाचे वरदान कधीच निष्फळ होऊ शकत नाही. यामुळे आता आपण एखाद्या मुलीसोबत याचे लग्न करू. राणीच्या बोलण्याला दुजोरा देत द्रुपद राजाने दशार्णराज हिरण्यवर्माच्या मुलीसोबत शिखंडीचे लग्न लावून दिले. जेव्हा हिरण्यवर्माच्या मुलीला आपले एका मुलीसोबतच लग्न झाल्याचे समजले. तेव्हा तिने सर्व सत्य आपल्या वडिलांना सांगितले. हे ऐकून राजा हिरण्यवर्माने द्रुपद राजावच्या राज्यावर आक्रमण करण्याचे ठरवले.राजा हिरण्यवर्मा आक्रमण करणार असल्याची बातमी शिखंडीला समजल्यानंतर स्त्री रुपी शिखंडी प्राणत्याग करण्यासाठी वनामध्ये निघून गेली. त्या वनाचे रक्षण स्थूणाकर्ण नावाचा एक यक्ष करत होता. शिखंडीला वनात पाहिल्यानंतर यक्षाने शिखंडीला येथे येण्याचे कारण विचारले. त्यानंतर शिखंडीने यक्षाला पूर्ण घटना सांगितली. संपूर्ण घटना जाणून घेतल्यानंतर त्या यक्षाने शिखंडीच्या मदतीसाठी स्वतःचे पुरुषत्व शिखंडीला दिले आणि तिचे स्त्रीत्व स्वतः धारण केले.यक्षाने शिखंडीला तुझे कार्य पूर्ण झाल्यानंतर मला माझे पुरुषत्व परत दे असे सांगितले. पुरुषामध्ये रुपांतरीत झालेला शिखंडी परत राजवाड्यात आला. शिखंडीला पुरुष रुपात पाहून दुर्पद राजाला खूप आनंद झाला. राजा हिरण्यवर्मानेही शिखंडीच्या पुरुष रुपाची परीक्षा घेतली आणि शिखंडीला पुरुष झालेले पाहून प्रसन्न झाला.कुबेरदेवाने दिला यक्षाला शाप - शिखंडी पुरुष रुपात पांचाळ नगरात राहू लागला. याच दरम्यान एके दिवशी यक्षराज कुबेर फिरतफिरत स्थूणाकर्णच्या वनात आले. परंतु तो यक्ष त्यांना अभिवादन करण्यासाठी समोर आला नाही. तेव्हा कुबेराने इतर यक्षांना याचे कारण विचारले. त्यानंतर कुबेरदेवाला संपूर्ण सत्य समजले आणि त्यांनी स्थूणाकर्णला तुला याच रुपात राहावे लागेल असा शाप दिला. स्थूणाकर्णने क्षमा मागितल्यानंतर यक्षराजाने सांगितले की, शिखंडीच्या मृत्युनंतर तुला पुन्हा तुझे पुरुषत्व प्राप्त होईल. इकडे शिखंडीचे कार्य पूर्ण झाल्यामुळे तो स्थूणाकर्णकडे आला. तेव्हा स्थूणाकर्णने सर्व घटना शिखंडीला सांगितली. हे ऐकल्यानंतर शिखंडीला खूप आनंद झाला. संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर भीष्म दुर्योधनाला म्हणाले की, अशाप्रकारे राजा द्रुपदचा मुलगा शिखंडी पहिले स्त्री होता आणि आता पुरुष झाला आहे. यामुळे त्याच्यासोबत युद्ध करणे योग्य नाही.
X