Home
|
Jeevan Mantra
|
Pauranik Rahasya Kathaa
|
vat purnima 2017 satyvan savitri marriage story news marathi
वटपौर्णिमा : सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त यमाने सावित्रीला दिले होते आणखी तीन वर
जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 08, 2017, 12:02 AM IST
पंचांगानुसार आज (8 जून, गुरुवार) वटपौर्णिमा आहे. हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव
-
पंचांगानुसार आज (8 जून, गुरुवार) वटपौर्णिमा आहे. हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. असाध्य गोष्ट साध्य करण्याकरिता स्त्रियांच्या बाबतीत पतीनिष्ठा ही महत्त्वाची आहे. या संदर्भात पुराणात पुढीलप्रमाणे कथा सांगण्यात आली आहे.
जाणून घ्या, यमदेवाने सावित्रीला सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त आणखी कोणते तीन वर दिले होते.... -
अश्वपती या राजाची एकुलती लाडकी कन्या सावित्री उपवर झाली तेव्हा त्याने तिला पती निवडण्याचा अधिकार दिला. यावरून त्या काळात स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान होता, ही बाब लक्षात येते. सावित्रीने एका देखण्या, निर्धन, गरीब अशा सत्यवान या तरुणाची पती म्हणून निवड केली. सात्विक व विश्वासू वृत्ती असल्याने दरबारातील काही व्यक्तींनी गैरफायदा घेऊन त्यांचे राज्य गिळंकृत केले होते. सत्यवान आई-वडिलांना घेऊन रानावनात भटकत होता. विवाह ठरल्यानंतर नारद मुनींनी सावित्रीचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. सत्यवान अल्पआयुष्यी आहे, एक वर्ष त्याचे आयुष्य आहे, तू लग्न करू नकोस, असे समजावले. पण ती आपल्या विचारापासून ढळली नाही. योग्य मुहूर्तावर तिचा सत्यवानाशी विवाह झाला.
-
बघता बघता वर्ष कधी संपले हे लक्षातही आले नाही. नेहमीप्रमाणे एके दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात निघाला. त्यावेळी सावित्रीने सोबत येण्याचा हट्ट धरला. जंगलाचे सौंदर्य ,पशुपक्ष्यांचा आवाज, नदीचा खळखळाट, फळांनी लकडलेले वृक्ष, हे सारे पाहात दुपार झाली. समोरच सत्यवान एका झाडाची फांदी तोडता तोडता धाड्कन जमिनीवर कोसळला. यमाने आपला फास सत्यवानाच्या गळ्याभोवती आवळला. सत्यवान मृत्यू पावला.
-
यमराज सत्यवानाचा आत्मा घेऊन निघाला तेव्हा सावित्री त्याच्यापाठोपाठ चालली. तेव्हा यम तिला म्हणाला, ‘तू मागे-मागे येऊ नकोस, तू घरी जाऊन सासू-सासर्याची सेवा कर’. पण सावित्री काही न बोलता ती यमाच्या पाठीमागे चालत होती. अखेर यम तिला म्हणाला, ‘हे पतिव्रते मी सत्यवानाच्या प्राणाशिवाय तुला तीन वर देतो, तू माग.’
तिच्या पतीवरच्या निस्सीम प्रेमाची यमराजालाही जाणीव होती. सावित्रीने तीन वर मागितले. प्रथम वर माझ्या सासू-सासर्यांची गेलेली दृष्टी परत येऊ दे. दुसरा वर त्यांचे गेलेले राज्य परत मिळू दे व तिसरा वर म्हणजे त्यांच्या मांडीवर नातवंडे खेळू दे. यमाने तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला. त्याच्या लक्षात आले की, नातवंडे खेळू दे असा वर दिला आहे म्हटल्यावर सत्यवानाचे प्राण आता सावित्रीला परत देणे भाग आहे. -
सत्यवानाचा प्राण परत मिळाला. तो उठून बसला. वैभव आले, वृद्ध आई-वडिलांना दृष्टी आली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि पतीवरच्या निस्सीम प्रेमामुळे सावित्रीने आपल्या संसारात आनंद भरला. हा सगळी कथा वडाच्या झाडाखाली घडली म्हणून ज्येष्ठ शुद्ध पौणिर्मेला सुवासिनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. ब्राम्हणाला दान दिले जाते. असे या वटपौणिर्मेचे महत्त्व आणि त्या पाठीमागची कथा आहे.