आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांचा थकवा असा दूर करावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या जीवनशैलीत डोळे या इंद्रियावर सर्वाधिक ताण पडतो. टीव्ही, इंटरनेट, चित्रपट... ही सर्व कृत्रिम साधने आहेत. मनोरंजन व कामकाजाचे जग पूर्णपणे बाहेर आहे. मात्र, या कृत्रिम साधनांवर सतत नजरा खिळवून ठेवल्यामुळे डोळे आणि मेंदूवर खूप ताण निर्माण होतो. या इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे निघणार्‍या विद्युत लहरींमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होतात, ही बाब वेगळीच. त्यामुळे लोकांना डोळ्यांचा थकवा, बौद्धिक कंटाळा व शरीर आखडणे अशा प्रकारच्या तक्रारी असतात.

सतत बाहेर पाहत राहिल्यास मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते. कारण अशा वेळी आपला स्वत:शी संबंध तुटलेला असतो. बाहेरील घटनांचाच खूप परिणाम होतो. त्यामुळे मन विश्रांती घेऊ शकत नाही. मनातील ही अस्वस्थता औषधांनी पळवून लावता येत नाही. कारण हा मुळात आजारच नाही. शरीर सुरळीत असले तरी मनावर ताणतणाव असतो.

डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी मंद प्रकाश असलेल्या एकांतातील खोलीत बसा. दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून ते झाकून घ्या. बंद डोळ्यावरील बाहुल्यांना हाताने हळुवार स्पर्श करा. आपल्या हातात मोरपंख आहेत व त्याने आपण डोळ्यांना स्पर्श करत आहोत, अशी कल्पना करा. डोळ्यांवर कोणताही ताण येऊ देऊ नका, ताण आल्यास संपूर्ण प्रक्रिया व्यर्थ ठरेल. ही प्रक्रिया खूप सावधानतेने करावी लागेल. कारण सुरुवातीला हातांनी डोळ्यांवर थोडा दाब टाकला जातोच. मात्र, हळूहळू दाब कमी करत गेल्यास एक क्षण असा येतो की हाताचा केवळ एक स्पर्श आपल्याला जाणवतो.

डोळ्यांवर हातांचा दाब पडल्यास या प्रक्रियेला अर्थ उरणार नाही. कारण डोळ्यांतून बाहेर पडणारी ऊर्जा अत्यंत नाजूक आहे. थोडा जरी दाब असला तरी ती संघर्ष करू लागते. त्यामुळे प्रतिरोध निर्माण होतो. आपण हाताने दाब दिल्यास डोळ्यांतून वाहणार्‍या ऊर्जेचा संघर्ष सुरू होईल. मात्र, हलक्या हाताने स्पर्श केल्यास डोळ्यातील ऊर्जा माघारी फिरते. ही ऊर्जा परत जाऊ लागल्यावर आपल्याला संपूर्ण चेहरा आणि कपाळावर हलकेपणाची जाणीव होईल. मन शांत होईल. ही परत येणारी ऊर्जाच आपल्याला हलकेपणाचा अनुभव देईल.

(फोटो - अमृत साधना)