आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जसे अन्न, तसे मन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याच्या जीवनात तीन मूलभूत गरजा असतात. अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यात अन्न ही अत्यंत आवश्यक अशी गरज आहे. आपण जगण्यासाठी खातो की, खाण्यासाठी जगतो हा विचार आपण करण्याची गरज आहे.
आपल्या जेवणात जर मांसाहार नसेल तर शरीरात प्रोटीनचे प्रमाण कमी होईल ज्यामुळे आपण कमकुवत बनू, असा पूर्वापार गैरसमज आहे. परंतु, कधी एकांतात बसून आपण आजूबाजूला किंवा इतर प्राण्यांचे जीवन पाहिले तर पुष्कळशी तथ्ये आपल्या समोर येतील. उदाहरण द्यावयाचे झाले तर कित्येक असे प्राणी आहेत की, ते शाकाहारी असूनही अत्यंत शक्तिशाली आहेत. यात सगळ्यात चांगले उदाहरण हत्तीचे आहे.
पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या कल्पनांना बाजूला सारून सत्य स्थितीचा विचार केला तर आपल्यामध्ये आध्यात्मिक संवेदना जागृत होणे चालू होते ज्याच्या फलस्वरूप आपल्या आचार-विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन होते. ही नवजागृत संवेदनशीलता आपले शरीर व त्यात निवास करणारा आपला आत्मा दोघांसाठी आपल्याला एक विशाल दृष्टी प्रदान करते आणि मग आपले सूक्ष्म मन हा निर्णय घेण्यास सक्षम होते की, आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते आपले शरीर व आपल्या मनासाठी आरोग्यवर्धक आहे की नाही?
कित्येकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, मनुष्याला शाकाहारीच का असायला हवे? याचे उत्तर एकदम सोपे आहे. सर्वात प्रथम आपल्याला हे सत्य अवगत असायला पाहिजे की, मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती अहिंसक आहे, तसेच त्याच्यावरील मूळ संस्कार दया, शांती, शीतलता आणि क्षमाशीलता आहे. सध्या विश्वात सुरू असलेली अशांतता, चिंता, भय, दु:ख, हिंसाचार या सार्‍यांचे मुख्य कारण मनुष्याचे अशुद्ध खाणे-पिणेच आहे. कारण जेव्हा मनुष्य आपल्या स्वार्थासाठी प्राण्यांची कत्तल करतो तेव्हा प्राण्यांचे ओरडणे, दु:ख या सार्‍या नकारात्मक भावनांचे कंपन त्यांच्या मांसातून बनणार्‍या पदार्थांमध्ये उतरते. म्हणूनच आरोग्यदायी व्यक्ती तीच ज्याचे शरीर आणि मन शुद्ध आहे.