अपमान पचवायला शिका, असं अण्णा का सांगतात ?
बुद्ध, महावीर, विवेकानंद, गांधी आणि आता अण्णांपर्यंत ही परंपरा अनेक रूपांत येत राहिली आहे.
-
दोन गोष्टी पचवायला मोठी ताकद लागते. मान आणि अपमान. मान पचवता आला नाही तर अहंकाराचे ढेकर येण्यास सुरुवात होते. मानाचे अपचन दुर्धर आजारासारखे वाटते, परंतु अपमान पचवणे त्यापेक्षाही कठीण आहे. मानाचा तर लोक विनम्रतेने सांभाळ करतात. मोठे होऊन विनम्र बनण्यात अहंकार संपुष्टात येतो. परंतु अपमान सहन करण्यासाठी मोठी हिंमत लागते. गेल्या काही दिवसांत अण्णा हजारे यांनी जीवनाचे जे सूत्र दिले होते, त्यात एक महत्त्वाचे होते. अपमान पचवायला शिका. थोडे धैर्य ठेवले आणि अपमान सहन केला तर अहंकार आणि क्रोध आपोआप गळून जातो. जेव्हा आपण चुकीच्या कामाबाबत विरोध करीत असतो तेव्हा भ्रष्टाचारी लोक आपल्याला चुकीचे ठरवण्यासाठी अपमानीत करण्याच्या विविध क्लृप्त्या शोधीत असतात. आपला अहंकार सक्रिय असेल तर आपणही आक्रमक होणार आणि चुकीच्या विरोधात असलेल्या योग्य लक्ष्यापासून भरकटणार, विचलित होणार. उद्योगपती सुरेश गोयल यांनी सांगितले होते की अण्णांचे हे सूत्र त्वरित स्वीकारून अजमावलेही. या सूत्रामुळे त्यांना एक नवी दृष्टी मिळाली. अपमान सहन करून तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता आणि लक्ष्यही प्राप्त करू शकता. रावणाने लंकेच्या सभेत हनुमानाचा अपमान केला होता. परंतु त्याने तो सहन केला आणि लंकेचे दहन, दुर्गुण विनाशाचे आपले लक्ष्य प्राप्त केले. बुद्ध, महावीर, विवेकानंद, गांधी आणि आता अण्णांपर्यंत ही परंपरा अनेक रूपांत येत राहिली आहे. अपमान पचवून चुकीच्या मार्गाला विरोध केल्यास तो यशस्वी होऊ शकतो.