Home | Jeevan Mantra | Dharm | bhagawan jagannath rath yatra

जाणून घ्या... जगन्नाथाची रथयात्रा सुरू होण्यामागची आख्यायिका

दिव्य मराठी | Update - Jul 12, 2011, 01:33 PM IST

भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरू होण्यामागेही अशीच एक आख्यायिका आहे.

 • bhagawan jagannath rath yatra

  ओरिसातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघते आणि ही रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. या रथयात्रेशी निगडीत काही आख्यायिकाही प्रचलित आहेत. भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरू होण्यामागेही अशीच एक आख्यायिका आहे.
  कलियुगाच्या प्रारंभी मालव देशावर राजा इंद्रद्युम राज्य करीत होता. हा राजा भगवान जगन्नाथाचा भक्त होता. एके दिवशी राजा इंद्रद्युम भगवंताचे दर्शन करण्यासाठी नीलांचल पर्वतावर पोहोचला. तिथे भगवंताची प्रतिमा दिसली नाही. निराश होऊन राजा परत फिरला तेव्हा आकाशवाणी झाली. लवकरच भगवान जगन्नाथ मूर्तीच्या स्वरूपात पुन्हा धरतीवर अवतरित होणार आहेत. आकाशवाणी ऐकून राजाला आनंद झाला.
  एकदा राजा इंद्रद्युम पुरीच्या समुद्रतटावर सहज फिरत होता. समुद्रात दोन लाकडाचे ओंडके त्याला तरंगताना दिसले. त्याच वेळी त्याला आकाशवाणी आठवली. राजाने विचार केला की आता या ओंडक्यांपासूनच मूर्ती बनवू. तेव्हा भगवंताच्या आज्ञेने देवांचा शिल्पकार विश्वकर्मा तिथे सुताराच्या रूपात प्रकट झाला. सुताराने राजाला म्हटले की, या ओंडक्यांपासून देवाची मूर्ती बनवता येईल. आधीच राजाच्या मनात असा विचार असल्यामुळे राजाने तात्काळ होकार दिला.
  विश्वकर्माने एक अट टाकली की, तो मूर्तीनिर्माणाचे कार्य एकांतात करेल. त्यावेळी तिथे दुसरा कोणी आला तर तो काम सोडून निघून जाईल. राजाने अट मान्य केली. मग गुण्डीचा नामक स्थानी विश्वकर्मा मूर्ती बनवू लागला. काही दिवसानंतर राज अट विसरला आणि तो सुताराला भेटायला गेला. राजाला पाहून सुतार अर्थात विश्वकर्मा अंतर्धान पावला आणि भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अर्धवटच राहिल्या. त्याच वेळी आकाशवाणी झाली. भगवंत याच रुपात स्थापित होऊ इच्छितो. मग राजाने भव्य मंदिराची निर्मिती करून तीन्ही मूर्तींची स्थापना केली.
  भगवान जगन्नाथाने मंदिर निर्माणाच्या वेळी राजाला सांगितले होते की वर्षातून एकदा तो आपल्या जन्मभूमी अवश्य जाईल. स्कंदपुराणातील उत्कल खंडानुसार इंद्रद्युम राजाने आषाढ शुक्ल द्वितियेच्या दिवशी प्रभूची जन्मभूमीला जाण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून या दिवशी रथयात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे ते आजतागायत.

Trending