आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशमंत्र : भगवद्गीता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक युवक तावातावाने बोलत होता. त्याची कसलीशी योजना वडिलांनी नाकारली होती. वडिलांच्या नकाराचा त्याला संताप आला होता. 'अहो, माझ्याकडे एक नव्हे तर तीन डिग्य्रा आहेत. घरी भरपूर पैसा आहे. माझ्यासाठी काहीही करायला मित्र तयार आहेत. मला हजार टक्के यशाची खात्री आहे. पण, माझे वडील म्हणजे..' तो खूप बोलला. त्याला वाटत होते की, मी त्याची बाजू घ्यावी. त्याच अपेक्षेने तो माझ्याकडे बघत होता. मी विचारले, 'गीता कधी वाचली आहेस का?' प्रश्न त्याला अनपेक्षित होता. 'गीता? माझा नाही देवावर विश्वास!' तो म्हणाला. मी हसून म्हटले, 'देवाचा इथे काय संबंध? गीता काय देव देव करायचा ग्रंथ आहे? तो तर एक सेल्फ असेसमेंट कोर्स आहे. तू ज्या आत्मविश्वासाविषयी बोलतो आहे तो खरेच सेल्फ कॉन्फिडन्स आहे की, ओव्हर कॉन्फिडन्स आहे?' मी त्याच्या हाती गीता दिली.
गीता नुसता धर्मग्रंथ नाही. केवळ 'कृष्णार्जुन' संवादही नाही. देवाधर्माचे तर ते मुळीच पुराण नाही. पहिल्या अध्यायात एका ठिकाणी दुर्योधनाचे मनोगतही येते. दुर्योधन पितामह भीष्मांना युद्धभूमीचे स्वरूप सांगतो आहे. भीष्म सेनापतीही आहेत. कुरुक्षेत्रावरच्या शक्तीचे चित्र दुर्योधन रेखाटतो आहे. वरवर पाहिले तर प्रचंड आत्मविश्वास त्याच्या बोलण्यातून ओसंडत आहे. पण, आपल्याच कुकर्माचे भूत त्याला त्रास देत असल्याने तो जास्तच चढय़ा आवाजात बोलतो आहे हे लक्षात येते. कारण जो खरा आत्मविश्वास बाळगतो तो आक्रस्ताळेपणा करीत नाही. रणांगणावरही तो 'बॅलन्स्ड'. दुर्योधनाचे तसे नव्हते म्हणूनच तो 'ओव्हर कॉन्फिडन्स'ची भाषा करतो आहे. त्या तावातावाने बोलणार्‍या युवकासारखेच दुर्योधनाचे बोलणे वाटते.

दुर्योधन म्हणतो आहे, 'पितामह, आपल्या नेतृत्वाखाली शूरवीरांचे हे असीम, अफाट सैन्य बघा आणि ते बघा त्या भीमांच्या नेतृत्वाखालचे मुठभर सैन्य! बिचारा दुर्योधन!' त्याला वाटते मोठय़ा संख्येनेच यश मिळते. डिग्री, पैसा, मित्र याने यश मिळेल असे त्या युवकाचे वाटणे, दुर्योधनाच्या चालीचे गाणे नव्हे काय? यशासाठी आणखी काही हवे असते याचा विसर पडून कसे चालेल?

धैर्य, संयम, मूल्यनिष्ठा

अध्यात्म यशासाठीचा गुरुमंत्र आपल्याला देते. यशासाठी धटिंगणपणा नव्हे, धैर्य हवे असते. श्रीकृष्णाकडे ते होते. अर्जुनाचे धैर्य संपले तसा तो विषादग्रस्त झाला. आधुनिक मानसशास्त्राने अर्जुनाच्या या मनोविकाराला 'एन्झायटी स्टेट-न्यूरोसिस' म्हटले आहे. स्वामी चिन्मयानंदांनी याचा नेमका उल्लेख केला आहे. दुर्योधनाचेही धैर्य संपले होते. तोही 'फाजील आत्मविश्वासाच्या' विकाराने ग्रस्त झाला होता. अर्जुनावर श्रीकृष्णाचे प्रेम असल्याने, समुपदेशाने त्याने अर्जुनास विकारमुक्त केले. उलट, दुर्योधनाची भीष्मांना दया आल्याने, शंखनादाचे उत्तेजक द्रव्य त्यांनी दुर्योधनाला दिले. समुपदेशनात संयम असतोच. उत्तेजकात तो नसतो म्हणूनच धैर्य, संयमाच्या पाठी यश येते, आवेशाच्या नव्हे!

मूल्यनिष्ठेला सर्वाधिक प्राधान्य देणे म्हणजे आध्यात्मिक असणे. कौरव सेना मूल्यासाठी लढत होती असे म्हणता येत नाही. दुर्योधनच म्हणतो आहे की, 'माझ्यासाठी प्राण देण्यास अन्य अनेक शूर येथे जमा झाले आहेत' तर पांडव सेना धर्मसंस्थापने'च्या मूल्यासाठी एकत्र आले आहेत. यशस्वी पांडव झाले हा दैवी चमत्कार नव्हता. एका सच्च्या निरपेक्ष नेतृत्वाने, मूल्याधिष्ठित जीवनाची (म्हणजेच पारमार्थिक जीवनाची!) ज्योत सर्वांच्या हृदयात तेववून यशस्वी होण्याची प्रेरणा दिली होती. श्रीकृष्णाचे 'मोटीव्हेशनल स्किल' असे होते!

चिडलेल्या त्या युवकाने गीता वाचली की नाही हे कळू शकले नाही. पण ती वाचून, शंखनादापेक्षा समुपदेशन महत्त्वाचे असते हे त्याला पटले असेल तर तो यशाच्या दिशेने निघालेला असणार याची मला खात्री आहे. गीता वाचून ती जीवनात उतरविणारा अपयशी होऊच शकत नाही. गीता अद्भुत आरसा आहे. सामान्य आरसा 'आहे ते' दाखवतो. गीता असे करतेच करते, पण आपल्या 'स्वरूपाला' साजेसे घडवून ते उत्तम रूपही आपल्याला दाखवते. हेच स्वरूप दर्शन नाही का?

0 vivek_ghalsasi@yahoo.com