आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दररोज करा मनाची स्वच्छता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी मी एका मित्राशी गप्पा मारत होते. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे जवळची नाती जपणे फार कठीण असते. मग ती नवरा-बायकोची असो, मैत्रीची असो किंवा अन्य कोणतीही. लोक जसजसे एकमेकांच्या जवळ येतात, नात्यातील माधुर्याचे रूपांतर तसतसे कटुतेत होत जाते. औपचारिक संबंध जपणे सर्वात सोपे असते. कारण त्यात तुम्हाला तुमचा खरा चेहरा दाखवावा लागत नाही. घनिष्ठतेमध्ये तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या भावविश्वात इतरांना स्थान द्यावे लागते. एक तर एवढी जागा कोणाच्या मनात नसते व असली तरी ती ‘अहं’ने व्यापलेली असते. इतरांशी जुळवून घेण्याचे कोणतेही प्रशिक्षण आपल्याला मिळालेले नसते, म्हणूनच लहान-सहान गोष्टींमुळे संबंधात दरी निर्माण होते. वेळीच प्रयत्न केला नाही तर ही दरी रुंदावण्याची शक्यता असते.
अनेक वेळा इतरांच्या बोलण्यामुळे तुम्ही दुखावले जात असाल. काही काळानंतर संबंधित व्यक्ती ते विसरून जाते पण तुम्ही ते कवटाळून बसता. कारण त्या शब्दांमुळे तुमच्या मनावर जखम झालेली असते. पुढच्या वेळी त्या व्यक्तीस भेटताना तुम्ही या जखमेसह भेटता. ती व्यक्ती मात्र सर्वकाही विसरून गेलेली असते. तुम्ही भूतकाळात असता व ती व्यक्ती वर्तमानकाळात. दोघांमध्ये संबंध कसे प्रस्थापित होतील?
जर ही व्यक्ती तुमच्यासोबत राहत असेल, तर या जखमेवरच अनेक जखमा होत राहतात. त्यांच्याबाबत बोलून गैरसमज दूर करण्याची संधीच मिळत नाही. कारण ते आपल्या संस्कृतीतच नाही. जवळची नाती मधुर असावीत, हे माधुर्य कायम असावे यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. एखाद्याचे बोलणे तुम्हाला टोचते तेव्हा याकडे लक्ष असावे की या व्यक्तीचे असे बोलणे आपल्याला खुपले. यासोबत हेही लक्षात घ्यावे आपल्याला खुपले पण अशीही शक्यता आहे की त्याचा तसा उद्देश नसावा. माझ्या मनातच अशी हळवी जागा होती जेथे हा बाण खुपला. वेळीच सावध होऊन हा बाण काढून टाकावा. अन्यथा जखम मोठी होत जाईल, वेदना वाढतील व त्या कशामुळे होत आहेत हेच तुम्ही विसरून जाल.
दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्ही दुखावले गेले आहात. पण ही तुमची समस्या असल्याचे त्या व्यक्तीस मोकळेपणाने सांगा. ज्याप्रमाणे तुम्ही घरातील केरकचरा दररोज झाडता, कचरा घराबाहेर फेकता व घर साफ करता, त्याचप्रमाणे मनातील केरकचराही दररोज साफ करण्याची सवय लावून घ्यावी.