मृत्यू वय पाहत / मृत्यू वय पाहत नसतो, जेव्हा यायचे आहे तेव्हा तो येतोच...

धर्म डेस्क

Jul 14,2011 08:36:14 PM IST

माणसाचे संपूर्ण जीवन ही एक शाळाच आहे. या शाळेत आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही शिकायला मिळतेच. जीवनातील प्रत्येक क्षण म्हणूनच महत्त्वाचा आहे.
स्वामी रामतीर्थ जपानच्या प्रवासावर होते. स्वामींजी जहाजेतून प्रवास करीत होते. त्यात एक 90 वर्षांचा वयोवृद्ध ग्रहस्थ होता. स्वामींनी पाहिलं की तो एक पुस्तक उघडून चीनी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय. तो वृद्ध पुन्हा पुन्हा वाचून लिहिण्याचा सराव करीत होता. स्वामींना आश्चर्य वाटले. या वयात चीनी शिकून काय करणार, असा विचार स्वामींच्या मनात आला. एके दिवशी स्वामींनी त्या गृहस्थाला विचारलेच. क्षमा करा, आपले वय बरेच झाले आहे. या वयात तुम्ही ही भाषा कधीपर्यंत शिकणार ? आणि समजा तुम्ही चीनी शिकले तरी त्याचा उपयोग कधी आणि कसे करणार ?
हे ऐकून त्या वृद्धाने स्वामींवर एक कटाक्ष टाकला आणि विचरलं, तुमचं वय काय ? स्वामी म्हणाले, 30 वर्षे. वृद्ध हसून म्हणाला, या वयात प्रवास करताना तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवित आहात, याचे मला वाईट वाटते. मी तुमच्यासारखे विचार करीत नाही. मी जोवर जीवंत आहे, तोवर काही ना काही शिकत राहीन. शिकण्याला वयाची मर्यादा नसते. आणि हो, किती दिवस जीवंत राहीन याचाही विचार मी करीत नाही. कारण मृत्यू हा वय पाहत नसतो. तो कधीही येऊ शकतो. तुमच्या बोलण्यावरून तुमचे विचार कळतात. कदाचित असे विचार करण्यामुळेच तुमचा देश मागास आहे.
स्वामीजींनी त्या वृद्धाची माफी मागितली आणि म्हटले, तुमचे बरोबर आहे. काही शिकण्यासाठीच मी जपानला जात होतो. परंतु जीवनातील महत्त्वाचा धडा तुम्ही मला रस्त्यातच, एका क्षणात शिकविला.

X
COMMENT