आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे, हाही गणेशोत्सवामागील उद्देशच !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती हा गणांचा नायक आहे. गणतंत्रामध्ये नायकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. जर गणच असंघटित, उद्देशहीन आणि अशक्त असेल तर गणनायकाकडे हात जोडून करुणा भाकल्याने काहीही साध्य व्हावयाचे नाही. राष्ट्राला गौरव, स्वातंत्र्य आणि अभ्युदय प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली गण (संघटित समाजशक्ती) गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण करणे हा लोकमान्यांचा उद्देश होता. आपल्या आतील गणनायकाला सबल, सशक्त करत अजेय गणशक्ती संघटित करणे हा गणेशोत्सवामागील मूळ भाव आहे; कर्मकांड नव्हे.
अंथरुणातून बाहेर न पडताच मोठमोठे उपदेशाचे डोस पाजणारी, फुकटचे सल्ले देणारी मंडळी सर्वच काळात असतात. सुरुवातीच्या काळातच लोकमान्यांनी त्यांना खणखणीत उत्तर देऊन ठेवलं आहे. 22 सप्टेंबर 1896 रोजी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात लोकमान्य म्हणतात, ""आपले राष्ट्र म्हणजे काही गुलामांचे राष्ट्र नाही. मानवी प्राण्याला कैद्याच्या राहणीने राहा असे सांगणे म्हणजे महामूर्खपणा आहे. समारंभ व थाटमाट ही प्रत्येक उत्सवाची आवश्यक अंगे होत. कोणतेही काम पैशावाचून होत नसते. इतर वाईट गोष्टींत पैसे खर्च होण्यापेक्षा गणेशोत्सवात थोडेबहुत खर्च झाल्यास पुण्यच आहे. या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या हौसेने खर्च करीत असतो. कोणाची कोणावर सक्ती नाही. आठ-दहा दिवस जर उत्साहाने काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यकच आहेत.''
लो. टिळक यांनी गणेशोत्सवासंबंधी व्यक्त केलेली मते वाचली तर ध्यानात येईल की, भारतीय तरुणांना जल्लोष करण्याची, रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे हाही गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे एक उद्देश होताच. त्यामुळे गणेशोत्सवावर टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. परंतु धर्मांध शक्तींशी संघटितरीत्या मुकाबला करणे हा गणेशोत्सवामागील एक प्रमुख उद्देश होता हे विसारता येणार नाही.