आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा जन्मदिन जन्माष्टमी म्हणून साजरा व्हावा,असे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचा भविष्य पुराणात उल्लेख आहे. हे व्रत केल्याने सुखशांती प्राप्त होईल असे कृष्णाने सांगितले. मथुरेत सुरू झालेले हे व्रत हळूहळू सगळीकडे केले जाऊ लागले. या वर्षी जन्माष्टमीचे हे व्रत 10 ऑगस्ट रोजी आहे.
श्रीकृष्णाचे हे जीवनसिद्धांत अंगीकारून सर्वश्रेष्ठ व्हा
संरक्षण - भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर विश्वास ठेवणा-यांचे उत्तम संरक्षक होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून याची प्रचिती येते. गोधन व गावाच्या संरक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलणे, वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीचे लज्जारक्षण, दुर्वासांच्या शापापासून पांडवांचे रक्षण करणे आदी प्रसंगांतून हेच स्पष्ट होते.
अहिंसा - कौरव-पांडवांच्या युद्धामुळे होणा-या रक्तपाताची त्यांना पूर्वकल्पना होती. हा रक्तपात होेऊ नये यासाठी ते शांतिदूत म्हणून कौरवांकडे गेले होते.
नात्यांची जपणूक - द्वारकाधीश झाल्यानंतरही श्रीकृष्ण बालपणीचा मित्र सुदामाला विसरले नाहीत. गरिबीने गांजलेला दीनवाणा सुदामा द्वारकेला आला तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा राजेशाही सत्कार केला व योग्य तो मानसन्मान दिला.
दूरदृष्टी / नियोजन - भगवान श्रीकृष्णाचे प्रत्येक काम नियोजनबद्ध असे. त्यांच्या यशाचे हेच रहस्य आहे. स्वत: श्रीकृष्ण ज्याचे सूत्रधार होते ते कौरव-पांडवांचे युद्ध याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णांच्या योजनांमुळेच पांडवांनी कौरवांना पराभूत केले. आपल्या रणनीतीनेच त्यांनी कर्णाची कवचकुंडले काढून घेतली. दुर्योधनाला संभ्रमात टाकून त्याच्या मांड्या गांधारीच्या दृष्टिशक्तीपासून वंचित ठेवल्या. त्यामुळेच भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाच्या मांड्यांचा चुराडा झाला व तो यमसदनी पोहोचला. कौरव-पांडव युद्धाचे चित्र पालटू शकणा-या बर्बरिकाचे मस्तक दानात मागून श्रीकृष्णाने त्याला या युद्धापासून दूर ठेवले.
सत्याचा आदर - कौरवांचे संपूर्ण हस्तिनापूरवर आधिपत्य होते. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. श्रीकृष्णाने पांडवांच्या विरुद्ध जावे व आपल्याशी हातमिळवणी करावी, याचे कौरवांनी अनेक प्रयत्न केले. पण श्रीकृष्ण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. त्यांनी नेहमी सत्याची सोबत केली.
मानसिक सक्षमता - आपल्या याच गुणामुळे श्रीकृष्ण कशाही परिस्थितीत उत्तम निर्णय घेऊ शकत. महाभारताच्या युद्धात द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती झाले तेव्हा त्यांना काटशह देण्यासाठी कृष्णाने ढोल-नगा-यांच्या गोंधळात ‘अश्वत्थामा हतो हता:’ असे म्हटले. श्रीकृष्णाचा हा डाव द्रोणाचार्यांना उमजला नाही, त्यांचा धीर खचला. त्या वेळात पांडवांच्या सैन्याने आपले काम चोख बजावले.
संयम - श्रीकृष्ण अत्यंत संयमी होते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांनी शिशुपालाच्या 100 चुका माफ केल्या होत्या. त्यानंतर पहिली चूक करताच त्यांनी शिशुपालाचा वध केला.
कार्यतत्पर - श्रीकृष्ण स्वत: नारायण होते. मात्र तरीही त्यांनी मानवरूपात जन्म घेतला. कर्माची महती पटवून देण्यासाठी महाभारताच्या युद्धात ते अर्जुनाचे सारथी झाले व विजय मिळवून दिला.
पं. के. के. शर्मा, अजमेर