जाणून घ्या... श्राद्धाचं / जाणून घ्या... श्राद्धाचं भोजन पितरांपर्यंत पोहोचतं कसं ?

Sep 13,2011 07:39:25 PM IST

हिंदू धर्म शास्त्रांनुसार प्रत्येक माणसावर तीन ऋण असतात. ऋषी ऋण, देव ऋण आणि पितृ ऋण. या ऋणांतून उतराई होणे महत्त्वाचे मानले गेले आहे. यातील पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध पक्षातील 16 दिवसांचे विशेष महत्त्व आहे. खास करून परिजनाच्या मृत्यूनंतर एक वर्षापर्यंत आणि त्यानंतरही मृतात्मा किंवा पूर्वजांना शांती आणि तृप्ती किंवा मोक्ष मिळण्यासाठी श्राद्धकर्म खूप आवश्यक मानण्यात आले आहे.
शास्त्रांत याला पितृयज्ञ म्हटले आहे. यात करण्यात येणा-या क्रियांमध्ये पितृगण किंवा पितरांबद्दल श्रद्धाभाव असल्यामुळे याला श्राद्ध म्हटले जाते. परंतु बहुतेक लोकांच्या मनात जिज्ञासा असते की, श्राद्ध कर्मात तर्पण, भोजन किंवा ग्रास द्वारा पूर्वज तृप्त होतात कसे. त्यांना भोजन कसे प्राप्त होते. या जिज्ञेसेचे निराकरण शास्त्रातील काही संकल्पनेने होऊ शकते.
शास्त्रांनुसार देह पंचमहाभूते अर्थात जल, अग्नि, पृथ्वी, वायू व आकाश आणि याशिवाय पंच कर्मेंदिये तसेच इतर मिळून एकूण 27 तत्त्वांनी बनलेले असते. परंतु मृत्यू झाल्यानंतर देह पंचमहाभूते आणि कर्मेंद्रिये सोडून देतो. मात्र बाकी 17 तत्त्वांनी बनलेले अदृश्य आणि सूक्ष्म शरीर अस्तित्वात असते.
असे म्हटले जाते की हा सूक्ष्म देह आसक्तीमुळे वर्षभर आपल्या मूळ स्थानी, घर आणि परिवाराच्या जवळ राहतो. परंतु स्थूल शरीर नसल्यामुळे त्याला सुख आणि आनंद उपभोगता येत नाही. कामना पूर्ण न झाल्याने तो असंतुष्ट राहतो. वर्षभरानंतर तो आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीत जन्म घेतो आणि जन्म मरणाच्या चक्रात येतो.
म्हणून जेव्हा पितृ पक्षात श्राद्ध कर्म करून पूर्वजांचे स्मरण करून धूप, तर्पण, ब्रह्मभोज केले जाते तेव्हा मंत्र, गंध, रस आणि भाव या माध्यमातून भोजन आणि सुख सूक्ष्म शरीर किंवा वेगवेगळ्या योनीतून फिरणा-या पूर्वजंना मिळून ते तृप्त होतात. त्यामुळे पितृपक्षाचा कालावधी शुभ आहे. या काळात पितर हे भूलोकावर परिजनांच्या जवळ येतात.

X