आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही कार्यामागे स्वच्छ मन, प्रामाणिकपणा महत्त्वाचा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वार्थी आणि कंजूष लोक प्रत्येक ठिकाणी स्वत:साठी संधी शोधत असतात. एवढेच नाही, तर धार्मिक-सामाजिक कार्य करतानाही ते कार्य सेवाभावी वृत्तीने करत असल्याचा देखावा करतात आणि त्यातही ते स्वत:चा फायदा-तोटा पाहत असतात.
सैद्धांतिक किंवा तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्यानेच व्यक्ती योग्य ठरू शकते का? त्याचे एक उदाहरण देत आहोत. दक्षिण प्रांतात एका माणसाला अनेक अडचणींनी घेरले होते. तो अत्यंत दु:खी होता आणि दररोज आपल्या अडचणी सोडवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. एकेदिवशी तो देवाजवळ गेला आणि ‘जर माझ्या अडचणी सुटल्या तर मी माझे घर विकून मिळालेला सर्व पैसा गरिबांना वाटून टाकेन,’ असे वचन त्याने दिले. तथापि, काही काळानंतर त्याच्या अडचणी सुटल्या; परंतु दिलेले वचन तो विसरला होता.
एकेदिवशी बसल्या-बसल्या त्याला आपण दिलेले वचन आठवले. आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावर आपल्याजवळील सर्व धनसंपत्ती गरिबांना दान द्यावी, याची परवानगी त्याचे मन देत नव्हते. याबाबत बराच वेळ त्याने विचार केला असता त्याला एक उपाय सापडला. पुढच्याच दिवशी त्याने आपल्या घरासमोर एक जाहिरातीचे पोस्टर चिकटवले. ‘घर खरेदी करा फक्त 10 रुपयांत, घरासोबत मांजर खरेदी करणे आवश्यक, मांजरीची किंमत 10 हजार रुपये’, असे त्या जाहिरातीत लिहिले होते. एका धनाढय़ व्यक्तीने मांजर आणि घर दोन्ही खरेदी केले. नंतर जाहिरात देणार्‍या त्या माणसाने आलेल्या पैशातील 10 रुपये गरिबांना वाटले आणि 10 हजार रुपयांचे नवीन घर खरेदी केले.
या किश्श्यातील घर विकणार्‍या माणसाची सैद्धांतिकदृष्ट्या चूक नाही; परंतु त्याचा स्वार्थ आणि घमेंड त्याच्या दुर्भावना जाहीर करतात. त्यामुळे कोणत्याही कार्यामागे लपलेले स्वच्छ मन किंवा उद्देश महत्त्वाचा मानला गेला आहे.