आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र ही जशी शूरवीरांची भूमी आहे तशी ती संत-महंतांचीही भूमी आहे. या महाराष्ट्रात संत नामदेव, संत रोहिदास, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशी परंपरा आहे. या संतमंडळींप्रमाणे माळी समाजात सावताबांनी जन्म घेऊन लोकांना खरा परमार्थ आणि भक्तिमार्ग दाखवून आपल्या जीवनाचे सार्थक कशात आहे, याचे मार्गदश्रन त्यांनी केले.

अरण या गावी संत सावता माळी यांचा शके 1172 म्हणजेच इ.स. 1250 साली जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परसुबा आणि आईचे नाव नगिताबाई. हे दोघे मोठे विठ्ठलभक्त होते. आई-वडिलांची भक्ती परंपरा सावतोबांनी तशीच पुढे सुरू ठेवली. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. परोपकारी वृत्ती आणि भगवत भक्ती हा या कुटुंबाचा गुण. शेती आणि बागायतीचे काम सावतोबा पाहत असे. त्यांची पत्नी जनाबाई ही मोठी साध्वी आणि धार्मिक प्रवृत्तीची होती. सावता महाराज नियमित पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दश्रन घेत असत. त्या विठ्ठलाच्या दश्रनाने त्यांचे अंग मोहरून जायचे. परमार्थ करण्यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, असे त्यांचे मत होते, म्हणून त्यांनी एक ठिकाणी असे म्हटले आहे,

प्रपंची असूनी परमार्थ साधावा।

वाचे आठवावा पांडुरंग।।

आपल्या वाट्याला आलेले किंवा आपण करीत असलेले काम ही त्या विठ्ठलाची पूजा आहे, त्याची सेवा आहे. या भावनेने कर्तव्यबुध्दीने केलेले काम म्हणजेच परमार्थ होय, अशी त्यांची दृढ श्रध्दा होती. आपले शेत म्हणजेच आपली माता आहे. त्या मातीची मोठय़ा मनोभावे सेवा करीत. त्यांच्या मळ्यात कोठेही तृण किंवा छोटा मोठा दगड-गोटा दिसत नसे. मोटेच्या दोरावर बसून मोट हाकताना ते उत्स्फूर्त अभंग म्हणत. माझ्या विहिरीत कधीही न आटणारे जे पाणी आहे ही त्याचीच कृपा आहे. वार्‍याने डुलणारी हिरवीगार रोपे पाहून ती जणू दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून विठ्ठलाचे भजन करीत आहेत, असे त्यांना वाटे. एक बी पेरले तर त्याच्या कितीतरी पटींनी उत्पन्न मिळते ही त्या पांडुरंगाचीच कृपा आहे. या भावनेतून त्यांना स्फुरलेला अभंग असा..

कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी।।

लसूण, मिरच्या, कोथिंबीर। अवघा झाला माझा हरी।।

मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापली पंढरी।।

सावता म्हणे केला मळा। विठ्ठलापायी गोविला गळा।।

आपल्या संसार सुखासाठी त्या विठ्ठलाकडे सावतोबांनी काही मागितले असते तर ते सहज मिळाले असते. पण त्यांना माहीत होते की लौकिकदृष्ट्या ज्याला सुख समजले जाते ते सर्व नश्वर आहे. ती सर्व माया आहे. या मोहमायेच्या जाळ्यात आपण परम सुखापासून वंचित राहू. या भवसागरातून जाताना चिरंतन सुखाच्या पैलतीराला जायचे असेल तर प्रत्येकाने सद्गुरुची प्राप्ती करून घ्यावी आणि भक्तीने देव जोडावा असे त्यांचे सांगणे होते.आयुष्यभर शेती व परमार्थ करणारे सावतोबा वयाच्या 45व्या वर्षी अचानक आजारी पडले. सिध्द लोकांचा सहवास लाभल्याने त्यांनी शके 1227 आषाढ वद्य 14 या दिवशी देह देवाला अर्पण करून ते वैकुंठाला गेले. अशा या सावताबांबद्दल संत एकनाथ महाराज म्हणतात..

माळियाचे वंशी सावता जन्मला।

पावन तो केला वंश त्यांचा ।।

त्याज सवे हरी खुरप लागे अंगे।

धावुनी त्याच्या मागे काम करी ।।

पीतांबर कास कोवोनी माझारी।

सर्व काम करी बीज संगे ।।

एका र्जनादनी सावता तो धन्य।

त्याचा महिमा न कळे काही।।