आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अन् शुचिता म्हणजे परमार्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शब्द तसे साधेच असतात. लहानसे असतात. तरीही आपल्या ओंजळीत अर्थाचे अथांग आकाश ते सांभाळत असतात. अंघोळ आपल्या सवयीची बाब आहे. स्वच्छतेसाठी ती आपण रोज करतो. काहीजण रोज दोनदाही अंघोळ करतात. पण केवळ शरीर स्वच्छ झाले की सारे भागते का? एवढय़ाने खरेच भागत नाही. शरीरासोबत मन, चित्त, स्वच्छ कसे करायचे? शुचिभरूत होण्यात आणि स्वच्छ होण्यात काय फरक आहे? स्वच्छता ही वरची गोष्ट झाली. शुचिता म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता! स्वच्छतेपासून शुचितेपर्यंत जाणे म्हणजे परमार्थ साधणे. शब्द अगदी लहान पण अर्थात किती फरक आहे, नाही?
परमार्थात स्वच्छता असतेच; पण शुचिता अधिकच असते. परमार्थ रोजच्या साध्या कृतीला ‘पूजा’ बनवतो. जेवणाच्या पदार्थाने भरलेले ताट आपल्या समोर येते. सारे काही स्वच्छ असते. पण, जेवणापूर्वी हात जोडून कृतज्ञता व्यक्त झाली की तेच ताट प्रसाद होते. खाद्यपदार्थ स्वच्छ असतात. प्रसाद मात्र शुचितेने भरलेला असतो. घर स्वच्छ असते आणि देवघर शुचिभरूत असते. परमार्थ पक्व व्हायला लागला की देवघरातील शुचिता घरभर दरवळते.
अशा परमार्थाचा संस्कार मंदिरातून, तीर्थक्षेत्रातून, आपल्यावर व्हावा अशी अपेक्षा असते. पण, अनुभव काय येतो? आपली मंदिरे, तीर्थक्षेत्रे कशी असतात? मी गेलो होतो अलाहाबाद येथे! तिथे गंगामाता पाहिली आणि माझ्या डोळ्यात पाणी दाटले. पितरांच्या स्मरणार्थ मी ‘तर्पण’ करावे असे पंड्या सांगत होता. पण, पाण्याला हात लावावा असे काही मला वाटत नव्हते. शुचिता राहोच, साधी स्वच्छताही तेथे नव्हती. सार्‍याच तीर्थक्षेत्रांची अवस्था, कमी-अधिक अशीच आहे. मग आपण भारतीय खूप धार्मिक आहोत, पारमार्थिक आहोत या म्हणण्याला काय अर्थ आहे.
अयोध्येत माझी रामकथा होती. श्रोते सात दिवस मोठय़ा तल्लीनतेने कथा ऐकत होते. वेळोवेळी त्यांचे डोळे भरून येत होते. शेवटच्या दिवशी मी म्हणालो, ‘उद्या आपण सकाळी शरयु नदीवर जाऊ. तिथला एक घाट झाडून स्वच्छ करू. किमान एक घाट तरी! तीच आपली रामसेवा. कारसेवा. ’ मी नावे नोंदवा असेही सांगितले. एकही नाव नोंदले गेले नाही. घाट अस्वच्छच राहिला आणि आम्ही शुचितेला मुकलो! आम्हाला रामाचे गुणगान ऐकायला आवडते. सांगायला तर खूपच आवडते. पण रामतत्त्वाचे आचरण मात्र मुळीच आवडत नाही, म्हणूनच श्रीरामजन्माचा फक्त सोहळा आम्ही करतो. चिमटभर सुंठवड्याचे धनी होतो. पण, खर्‍या शुचितेचा साक्षात्कार कधीच घेत नाही. अलाहाबाद असो की अयोध्या, नाशिक असो की पंढरपूर.. काहीतरी चुकते आहे.
काय बरे चुकते? धर्मप्रचार करणारी कितीतरी प्रबोधने मी आजवर ऐकली. चमकदार प्रवचने, रंगतदार कीर्तने ऐकली. ऐकली आणि ऐकवलीही! पण एकाही ठिकाणी वर्तनातील शुद्धतेचा, जगण्यातील शुचितेचा आग्रह कुठेच ऐकू आला नाही. नदीला आपण माता मानतो. नदी आपल्यासाठी पाणी नव्हे, तीर्थ असते. नदी आपल्या पापांचे क्षालन करते. पण तिच्या काठावर नैसर्गिक विधी उरकताना आपले मन कचरत कसे नाही? आपल्या भाविक अनुयायांना स्वच्छता आणि शुचितेचा मंत्र का दिला जात नाही?
स्वच्छता-शुचिता हा तिथल्या प्रशासनाचा विषय मानून प्रबोधक अलगद स्वत:ला दूर ठेवतात. माझी पारमार्थिक यात्रा, माझे पुण्य मिळवणे हा माझा विषय आहे की प्रशासनाचा? यात्रेत येणारे किती पुण्य मिळवून जातात ते देवच जाणे! पण यात्रा संपल्यानंतर मागे उरतात ते साथीचे आजार, हे नक्की! स्वत:ची स्वच्छता उपासना आहे आणि सार्वत्रिक स्वच्छता हा धर्म आहे याची जाणीव का नसावी? एवढी मंदिरे, इतके संत, एवढी तीर्थक्षेत्रे असणार्‍या आपल्या देशात शुचिता नाहीशी कशी झाली? शब्द तसे साधेच असतात. ते र्शवणानंदापुरते ऐकू अन् कथनानंदापुरते उच्चारू तर अक्षरांचा गुंताच हाती उरणार! शब्दांना आचरणाचा आधार दिला तरच शब्दांचा मंत्र होतो. पण आचरणाचा आग्रह धरू तर अनुयायींची संख्या रोडावेल असे तर प्रबोधकांना वाटत नसेल? परमार्थ चर्चेचा नव्हे चर्येचा विषय होईल तो सुदिन!