स्मरणात ठेवा : गाढव, मूर्ती आणि दंडुक्याची गोष्ट
एखादे तत्त्व गोष्टीच्या माध्यमातून सांगितले गेले तर मनाला अधिक भावते.
-
एखादे तत्त्व गोष्टीच्या माध्यमातून सांगितले गेले तर मनाला अधिक भावते. समाजात चांगली कामे करणा-या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना असतात. चांगली माणसेही कालांतराने बिघडताना दिसतात. अशी वेळ आपल्यावर येवू नये यासाठी पुढील गोष्ट सदैव मार्गदर्शक ठरणारी आहे.
एका गावात मंदिराची निर्मिती सुरू असते. काही वर्षानंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण होते. एका शुभ मुहूर्तावर मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरते. गावचा मुखिया शहरात येतो. सुंदर मूर्ती खरेदी करतो. बस थांब्यावर येतो. खूप वाट पाहूनही बस किंवा अन्य वाहने मिळत नाहीत. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त टळेल काय अशी भीती मुखियाला वाटू लागते. इतक्यात आपल्या गावचा कुंभार गाढवाला घेऊन गावाकडे चालल्याचे त्याला दृष्टीस पडते. मुखियाला वाटते की आपण ही मूर्ती गाढवावर ठेवून न्यावी.
मूर्ती गाढवाच्या पाठीवर ठेवून दोघेही गावची वाट चालू लागतात. वाटेत तीन चार गावं लागतात. गावावरून पालखी, नंदीध्वज किंवा देवाची मूर्ती जात असेल तर महिला घड्याने पाणी ओतून हळद-कुंकू लावून स्वागत करतात, अशी ग्रामीण भागात परंपरा आहे. त्यानुसार या मूर्तीची प्रत्येक गावात भक्ती-भावाने स्वागत होते. हे पाहून गाढवाला आनंद होतो. आपल्याला मिळत असलेला मान सन्मान पाहून त्याला मूर्तीचे ओझे वाटू लागते. मूर्ती टाकून देण्यासाठी गाढव उड्या मारू लागतो. हे पाहून मुखिया घाबरतो. तेव्हा कुंभार म्हणतो की, तुम्ही मूर्ती उचलून घ्या. मूर्ती बाजूला केल्यानंतर कुंभार आपल्या जवळील दंडुक्याने गाढवाला प्रसाद देतो. गाढव आता शांत होतो. मूर्ती घेऊन व्यवस्थित चालू लागतो. या प्रसंगाचे मुखियाला आश्चर्य वाटते.
गावागावात होत असलेल्या स्वागताने गाढवाला वाटते की आपलेच स्वागत होत आहे. आपल्यालाच मान सन्मान मिळत आहे. यामुळे आपण गाढव आहोत हे तो विसरला. आता दंडुक्याच्या प्रसादामुळे तो भानावर आला आहे. आपण गाढव असल्याची त्याला जाणीव झाली आहे, असे कुंभार सांगतो.
आपण समाजात काम करतो तेव्हा अनेकदा मानसन्मान मिळतो. मिळालेल्या मानसन्मानाने आपला अहंकार सुखावतो. यामुळे आपण मार्ग भरकटण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी कुंभाराच्या दंडुक्याची आवश्यकता असते. रोज 10 मिनिटे आत्मचिंतन केल्यास बाहेरून कोणत्याही दंडुक्याची गरज भासणार नाही, हे या गोष्टीचे तात्पर्य.