Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | story by swami chinmayananda

देव आणि राक्षस दोन्ही वृत्ती आपल्यातच कसे ते जाणून घ्या

सिद्धाराम भै. पाटील | Update - Sep 01, 2011, 06:09 PM IST

अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्यांना भावणारे तत्त्वज्ञान स्वामी चिन्मयानंद सांगत.

  • story by swami chinmayananda

    चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद हे भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्यांना भावणारे तत्त्वज्ञान ते सांगत. फसवून गोरगरिबांचे धर्मांतरण करणा-या शक्तींच्या ते विरोधात होते. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आपल्याला जीवनाकडे पाहायची निकोप दृष्टी देवून जाते. स्वामी चिन्मयानंद यांनी सांगितलेली गोष्ट अशी...
    प्राचीन काळी देव आणि दानव यांच्यात लढाया होत असत, अशा गोष्टी आपण पुराणात वाचतो. या गोष्टींत सांगितलेले असते की देव स्वर्गात असतात आणि राक्षस पाताळात. पाताळातील राक्षस स्वर्गावर आक्रमण करतात अशा या गोष्टी आहेत. त्रेतायुगात म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांच्या काळात राक्षस लंकेत तर देव अयोध्येत राहतात. म्हणजे देव आणि राक्षस दोन्हीही पृथ्वीतलावर राहतात. त्रेतायुगानंतर येते द्वापार युग. या युगात कौरव आणि पांडव एकाच घरात असतात. कंस आणि कृष्ण एकाच घरात असतात. म्हणजे राक्षसी वृत्ती आणि देव वृत्ती, चांगली वृत्ती एकाच घरात नांदतात.
    द्वापार युगानंतर आता आहे कलियुग. कलियुगात चांगली वृत्ती आणि वाईट वृत्ती एकाच माणसात असतात. प्रत्येकात या वृत्ती आहेत, हे प्रमाण प्रत्येकांत कमी अधिक असते. आपल्यातील चांगल्या वृत्तीची वाढ करणे म्हणजेच धर्म होय. आपण जेव्हा दुस-यांतील वाईट गुणांचा द्वेष न करता आपल्या आचरणातून दुस-यांमध्ये सदगुणवृद्धी करतो, तेव्हा आपला खरा विकास होतो. विकासाला गती मिळते. आपल्यातील देववृत्तीत वाढ करण्यासाठी चांगले वाचन, चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे.
    विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वामी चिन्मयानंदांनी ही गोष्ट सांगितली होती. या गोष्टीतून आपल्याला समाजाकडे पाहण्याची निकोप दृष्टी मिळते.Trending