आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या वटपौर्णिमेला वटवृक्षाला सुती धागा गुंडाळण्याचे महत्त्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन राज्यभरात प्रवासी वाहतुकीचे जाळे उभारणार्‍या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी विभागीय सल्लागार समितीची स्थापना केली. मात्र, या समितीची गेल्या दीड वर्षांपासून बैठकच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी एसटी महामंडळ हे माध्यम विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. त्यामुळे दररोज लाखो नागरिक एसटीतून प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयी, सुविधा, अडचणी, बसगाड्यांच्या वेळेचे नियोजन, प्रवाशी निवारा शेड उभारणे या कामांसह एसटी प्रशासन व प्रवाशी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्यासाठी जिल्हास्तरावर एसटी विभागीय सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये लोकप्रतिनिधींबरोबर त्या त्या जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील काही नागरिक व विविध विभागाचे अधिकारी यांची सदस्य म्हणून निवड केली जाते. तीन वर्षांचा कालावधी असणार्‍या या समितीत उस्मानाबाद येथे 17 सदस्य असल्याचे समजते. उस्मानाबाद येथील सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी आमदार राहुल मोटे असून, त्यांच्याव्यतिरिक्त 12 अशासकीय सदस्य आहेत. तसेच विभाग नियंत्रक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व रेल्वे अशा शासकीय विभागाचे अधिकारी या समितीत सदस्य आहेत. या समितीने प्रत्येक तीन महिन्यांस बैठक घेऊन प्रवाशांच्या समस्या सोडविणे, एसटी प्रशासनास सल्ला देणे अपेक्षित असताना प्रशासन व समिती सदस्यांनाही याकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षात एकही बैठक झालेली नसून, तत्पूर्वी विद्यमान सदस्यांच्या केवळ तीन बैठका झाल्याचे कळते. त्यामुळे प्रवाशांच्या अडी-अडचणीला सध्या तरी कोणी वाली नाही.