आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कोणते दागिने कोठे घालावेत?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा - तालुक्याचे ठिकाण असणार्‍या मंठा येथे ‘एक गाव एक गणपती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत राजे छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी कय्युम महेमूद कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे.
मंठा शहरात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधीक्षक संदिपान कांबळे, तहसीलदार प्रशांत पडघन, पोलिस निरीक्षक प्रकाश डुकरे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी, गणेश मंडळाचे अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व गावकर्‍यांची बैठक घेण्यात आली. 11 सप्टेंबर रोजी तहसीलदारांच्या उपस्थितीत, तर 15 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधीक्षक कांबळे यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. याप्रसंगी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी प्रतिसाद दिला. उपस्थिांपैकी अनेकांनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवण्याचा मनोदय बोलून दाखवला.

मंठा शहरात चार वर्षांपासून येथील मुस्लिम बांधव मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होतात. मुस्लिम बांधवांच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांचे स्वागत केले जाते तसेच येथील मुख्य मशिदीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली जाते. ईदमध्येही हिंदूबांधव सहभागी होऊन त्यांना मनोमन शुभेच्छा देतात, अशी येथील परंपरा आहे.
‘एक गाव एक गणपती’ साठी झालेल्या बैठकीत प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी हा सार्वजनिक उत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्याची ग्वाही दिली. गावातील शांतता, सामाजिक सलोखा व जाती-धर्मांतील एकात्मता वाढीस लागावी या दृष्टिकोनातून प्रत्येकाला हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी मुस्लिम व्यक्तीची निवड करून मंठेकरांनी खर्‍या अर्थाने एकात्मतेचे दर्शन घडवले आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही हा आदर्श उपक्रम राबवला जावा, अशी यानिमित्ताने अपेक्षा व्यक्त केली जात आहे.