आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातील स्त्रियांना मान-सन्मान मिळत असेल तरच घरात वैभव नांदते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक जीवनाचा आनंद, भरभराट, आरोग्यासाठी भारतीय गृहिणींनी सणवार, व्रतवैकल्ये, कुलाचार यांचे पिढय़ानपिढय़ा मनोभावे आचरण केले आहे. परंपरेनुसार भगवान महाविष्णू आणि महालक्ष्मीची आराधना घराघरांत केली जाते. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक गृहिणी कुळलक्ष्मी असते, भगवती शक्ती असते, म्हणून कुटुंबात पत्नीला सन्मान, आदर, स्नेह मिळत असेल तर घरात वैभव नांदते असे म्हटले जाते.
आनंदीआनंद नित्य टिकून राहतो, संतती सद्गुणी, बुद्धिमान, निरोगी जन्माला येते. प्रत्येक गृहिणी अन्नपूर्णा आहे. हा संस्कार स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात सहनशीलता, त्याग, कर्मनिष्ठा व्यापक करतो. धर्मग्रंथांमध्ये, पुराणात शक्ती, लक्ष्मीची अनेक मनोहारी स्तुतिस्तोत्रे रचलेली आहेत. पुराणांत वर्णिल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी क्षीरसागराची कन्या, रत्नमाणिकांचे आभूषण ल्यायलेली, स्वर्णमोहरांची बरसात करणारी गजलक्ष्मी आहे. चार दिशांचे स्वामी, चार गज स्वर्णघरांतून लक्ष्मीवर जलवर्षाव करीत असतात. अशी निर्मळ, शुद्ध, निष्कलंक लक्ष्मी माणसाच्या हृदयात सात्त्विक भावभावना, विचारांच्या आर्शयाने निवास करते.
वैदिक लक्ष्मीचा बीजमंत्र ‘श्री ’ आहे. ‘श’ किंवा ‘ह’चा अर्थ आहे-चैतन्यपूर्ण आकाश अथवा चिदाकाश, ‘र’चा अर्थ आनंद आहे, ‘ई’ शक्तीवाचक अक्षर असून, अनुस्वार ‘उन्मेष,’ प्रस्फुटन दर्शवते. असा रमणीय अर्थ सखोलपणे या बीजाक्षरांमध्ये व्यापून आहे. शिवतत्त्व परम संविदरूप निगरुणतत्त्व आहे. ते ‘अस्ति’ रूप आहे. चैतन्यशक्तीचे त्यात स्फुरण झाले की ते सगुण ईश्वर बनते. ‘अस्ति’पासून ‘अस्तित्व’ आकाराला येते. ‘अस्तित्व’ शब्दच मुळी ईश्वराचे सगुण प्रकटीकरण, ईश्वराची गुण, दशा, क्रिया स्पष्ट करणारा शब्द आहे. भारतीय अध्यात्म साधनेतील सर्व बीजमंत्रे ‘अस्ति ते अस्तित्व’ अशी ईश्वरूपाच्या विकासाची सूत्ररूप अभिव्यक्ती करतात.
जीवनात जे जे काही सुंदर, उज्‍जवल, मधुर, स्वादिष्ट, पुष्ट, तुष्ट करणारे आहे, त्यांचा समन्वय म्हणजे ‘श्री ’ होय. हे सृष्टीत सदैव उपलब्ध करून देणारी देवता ‘श्री ’ शक्ती आहे. वैदिक ऋषींनी श्री सूक्तात’ शक्ती महालक्ष्मी किंवा ब्रह्ममायेचे वर्णन, ‘सूर्या’ हिरण्यवर्णा.. चंदा मधुमयी, गंधद्वारां दुराधर्षा नित्यपुष्टां करिषिणीम्’ असे केले आहे. या उपमा सावित्री शक्ती, चंदशक्ती, पृथ्वीशक्तीचा विलक्षण समन्वय दर्शवितात. ‘आगम’ ग्रंथानुसार ‘श्री ’ शक्ती आदिमाया, सृष्टीचे मूळ बीज आहे. सावित्री महासरस्वती आहे. ती ‘सुवर्णा हेममालिनीं’, ‘सुवर्णरजतस्त्रजाम’ आहे. सोमा माधवीलक्ष्मी ‘चंद्रां हिरण्यमयीं’, ‘पद्मे स्थितां पद्मवर्णा’ ‘पिंगलांपद्ममालिनीं’ आहे.
दुराधर्षा पृथ्वी जगन्माता शक्ती पार्वती, रूद्राणी, अन्नपूर्णा शक्ती आहे. ती ‘आर्दां ज्वलंती तृप्तां तर्पयन्तीम्’ ‘ईश्वरीं सर्व भूतानां’, पशुनां रूपमन्नस्य मयि ‘श्री श्री यतां यश:’ अशी आहे. सुंदर, पवित्र कमलपुष्य महालक्ष्मीचे आसन आहे. कमलपुष्प सृजनाचे प्रतीक आहे. अखंड जीवन-सृजन, प्रकृती-निर्माण करणारी आदिमाया ब्रह्मशक्ती ‘कमलास्थिते’ असणे स्वाभाविकच आहे.
योगदर्शनानुसार मोक्षाचे अंतिम स्थान ब्रrानंद व अमृत वर्षाव करणारे कमळ सहस्त्रदल ब्रह्मकमळ मस्तकात असलेले सहसार चक्र आहे. त्यास ‘श्री चक्र’ही म्हटले जाते.
ती कृषी लक्ष्मी, शस्यलक्ष्मी आहे. तीच भूमा, सीतामाता आहे. या सर्व अंतत: विष्णुपत्नी श्री महालक्ष्मीमध्ये अंतभरूत, एकरूप होतात. ही महालक्ष्मी अदृश्य चिंतामणी, कल्पवृक्ष बनून घरा-घरांत विराजते. घराचे आनंदी गोकुळ बनवते. पवित्र मनाच्या इच्छा-आकांक्षाही पवित्र, उच्च, हितकारी असतात, म्हणून अवश्य पूर्ण होतात. अशा घरांनी, कुटुंबांनी बनलेले राष्ट्र ‘सुजलाम्, सुफलाम् शस्य-शामलां’ बनून राष्ट्र-लक्ष्मी बनते. सारांश, लक्ष्मी मंगल शक्ती आहे. भगवान श्री स्वामी सर्मथ महाविष्णू व महालक्ष्मीचे अद्वैत-अधिष्ठान आहेत. त्यांची उपासना अनन्य भावनेने जेथे केली जाते, तेथे सर्व प्रकारची समृद्धी नांदते. योगक्षेम चालवण्याचे आश्वासन त्यांची सेवा देत असते. पण, पाकात गुंतलेल्या माशीसारखे क्षणभंगुर ऐश्वर्यात गुंतू नये. हेही स्वामी सेवकांनी ध्यानी ठसवायला हवे. हृदय कमळ, परोपकार, त्याग, सेवा, विनम्रता गुरुचरणांच्या आस्थेने विकसित होत जाईल, तसतशी ही चैतन्याची उज्ज्वल लक्ष्मी अधिक सक्रिय होऊन नि:स्वार्थ प्रेमाच्या प्रकाशात मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवेल यात शंका नाही.