आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 200 Test Match; Mumbai, Wankhede Stedium, Match Ticket

सचिनची 200 वी कसोटी: सर्वसामान्य चाहत्यांनाही मिळणार अधिक तिकिटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सचिन तेंडुलकरच्या 200 व्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिकिटांसाठी प्रचंड मागणी लक्षात घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या संलग्न क्लबच्या वाट्याची तिकिटे आणि अन्य सन्मानिका कमी करून सर्वसामान्य क्रिकेट रसिकांसाठी अधिकाधिक तिकिटे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने त्यासाठी संपूर्ण वानखेडे स्टेडियमचा चार्ट समोर ठेवून काटेकोरपणे तिकिटांच्या वितरणाची व्यवस्था करण्याचा तातडीने निर्णय घेतला आहे.

एमसीएच्या या आधीच्या करारपत्रकानुसार गरवारे क्लब हाऊस, बीसीसीआय, आयसीसी, बीसीसीआयची संलग्न राज्य संघटना, राज्य शासन, पाच जिमखाने यांना ठरावीक तिकिटे द्यावी लागतात. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या तिकिटांमधून 329 क्लबना सम प्रमाणात तिकिटे सवलतीच्या दरात द्यावी लागतात. त्यानंतर जी तिकिटे उरतात ती सर्वसामान्य क्रिकेट रसिकांसाठी उपलब्ध करण्यात येतात.

या वेळी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व तिकिटे ऑनलाइन विक्रीला न ठेवता प्रत्यक्षात तिकीट खिडकीवर ठेवण्यात येतील. त्यामुळे सर्वसामान्य क्रिकेट रसिकांना या वेळी स्वत: रांगेत उभे राहून तिकिटे घेता येतील आणि सचिनच्या शेवटच्या कसोटीचा आनंद लुटता येईल.

वानखेडेवर होणारी सचिनची 200 वी कसोटी अविस्मरणीय करण्यासाठी एमसीएने कंबर कसली आहे. त्यासाठी विविध समित्यांची देखील स्थापना करण्यात आली आहे.

एजन्सीला नकार
या पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. अनेक वेळा ऑनलाइन तिकीट विक्री करणार्‍या संस्थांनी आधी तिकिटे मागून घेतली आणि नंतर परत केली. त्यामुळे एमसीएलाही ती तिकिटे विकण्यास पुरेसा अवधी मिळाला नव्हता. म्हणून अशा कोणत्याही एजन्सीला ऑनलाइन विक्रीसाठी तिकिटे न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.