आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20th Asian Atheletics Competation : P. Udaylaxmi Found In Doaping Case

20 वी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: भारताची पी. उदयलक्ष्मी उत्तेजक द्रव चाचणीत दोषी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील बालेवाडीत बुधवारी ढगाळ वातावरणात सुरू झालेली 20 वी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा यजमानांसाठी काळवंडलेलीच ठरली. भारताची आघाडीची अ‍ॅथलिट पी. उदयलक्ष्मी उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळली आहे. यामुळे यजमानांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातून तिला वगळण्यात आल्याची माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनचे सचिव सी. के. वॉल्सन यांनी दिली. आंध्र प्रदेशातील 39 वर्षीय उदयलक्ष्मी गोळाफेक क्रीडा प्रकारात 6 जुलै रोजी सहभागी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच मेथिलीक्झॅनिमाइन हे उत्तेजक द्रव घेतल्याचे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या (नाडा) तपासणीत आढळले.


153 नमुने गोळा
‘नाडा’ने चेन्नई येथे गेल्या महिन्यात झालेल्या 53 व्या राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर 153 नमुने गोळा केले होते. त्यापैकी 151 नमुन्यांचे रिझल्ट हाती आले, ज्यात उदयलक्ष्मी पॉझिटिव्ह आढळली. ही चाचणी 4 ते 7 जुलै रोजी घेतली होती, अशी माहिती ‘नाडा’चे संचालक मुकुल चटर्जी यांनी दिली. राष्ट्रीय स्पर्धेत उदयलक्ष्मीने गोळाफेकमध्ये 13.68 मीटरची कामगिरी नोंदवत सुवर्णपदक मिळविले होते. नेहा सिंगने 13.56 मीटर गोळाफेक करीत द्वितीय, तर नवजित कौरने (13.49) तृतीय क्रमांक मिळविला होता. याबाबत वॉल्सन यांनी सांगितले, की ‘नाडा’ने घेतलेल्या नमुना चाचणीत दोषी आढळल्याने तिला भारतीय संघातून वगळण्यात आले असून, तिला आंध्र प्रदेशाला रवाना होण्यास सांगितले आहे.


दुस-यांदा आढळली दोषी
‘नाडा’ने घेतलेल्या चाचणीत दोषी आढळलेल्या उदयलक्ष्मीचा हा पहिलाच गुन्हा नाही. यापूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही ती उत्तेजक द्रव चाचणीत पॉझिटिव्ह आढळली होती. त्या वेळी ती 400 मीटर हर्डल्स, 200 मीटर, लांब उडीमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिने गोळाफेक खेळाकडे लक्ष केंद्रित केले. आशियाई अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या डोपिंग कमिटीचे सदस्य ए. के. मेंडीरत्ता यांनी डोपिंग चाचणीविषयी माहिती दिली.


पुढे काय?
‘नाडा’ने घेतलेल्या नमुन्यात उदयलक्ष्मी दुस-यांदा दोषी आढळल्याने तिच्यावर दोन वर्षांपर्यंत बंदी लादली जाऊ शकते. हा निर्णय भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या अखत्यारीत आहे. सध्या ती 39 वर्षांची असून, ती पुन्हा कमबॅक करण्याची आशा आता धूसर झाली आहे.