आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५ वी राष्ट्रीय स्पर्धा : महिलांची सोनेरी कामगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - महाराष्ट्राच्या संघाने ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाचा सिलसिला कायम ठेवला. महाराष्ट्राच्या महिला संघाने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. या संघाने सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात बंगालवर ३-१ अशा फरकाने मात केली. यासह महाराष्ट्राच्या महिला सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. तसेच नेमबाजीतही महिला संघाने सुवर्णपदक पटकावले.

पूजा सहस्रबुद्धे, मधुरिका पाटकर, चार्वी कावळे यांनी केलेल्या सोनेरी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, क्रितिविका शिनॉयने बंगालसाठी एकाकी झुंज देताना शानदार विजय मिळवला. मात्र, अंकिता दास आणि मौमी दासने एकेरीच्या लढतीत लाजिरवाणा पराभव पत्करला. यासह बंगालचा पराभव झाला.

पूजा सहस्रबुद्धेने एकेरीच्या पहिल्या लढतीत बाजी मारून महाराष्ट्राच्या विजयाचे खाते उघडले. तिने अंकिता दासला ११-६, ११-६, ११-५ अशा फरकाने पराभूत केले. यासह महाराष्ट्राने १-० ने लढतीत अाघाडी घेतली. मधुरिकाने महाराष्ट्राच्या आघाडीला २-० ने मजबूत केले. तिने मौमी दासचा पराभव केला. मधुरिकाने ११-७, ६-११, १३-११, १२-१० ने सामना जिंकला.

कुस्ती : अण्णासाहेब, महेशला रौप्यपदक
महाराष्ट्राच्या मल्लांनी दुसर्‍या दिवशी तीन पदकांची कमाई केली. यात दोन रौप्यसह एका कांस्यपदकाचा समावेश आहे. ग्रीको-रोमन पुरुषांच्या ७५ किलो वजन गटात अण्णासाहेब जगतापने रौप्यपदकाची कमाई केली. हरियाणाच्या सोनूविरुद्ध अंतिम लढतीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच ९८ किलो वजन गटात महेश मोहोळ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्यापाठोपाठ १३० किलो वजन गटात योगेश पवारने कांस्यपदक पटकावले.

अदितीला सुवर्णपदक, अवंतिकाला कांस्य
स्पर्धेच्या महिला गटातील ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या दोन युवा जलतरणपटू चमकल्या. यात अदिती धुमटकरने सुवर्णपदक पटकावले. तिने २६.९० सेकंदात निश्चित अंतर पूर्ण करून सोनेरी पदकावर नाव कोरले.

त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या अवंतिका चव्हाण हिने याच गटात कांस्यपदकावर नाव कोरले. तिने २७.३६ सेकंदात हे अंतर पूर्ण केले. या गटात हरियाणाची शिवानी कातानिया राैप्यपदकाची मानकरी ठरली. तिने २७.२६ सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली आहे.

टेनिस : प्रार्थना ठोंबरेला कांस्य
टेनिसमध्येमहाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी कांस्यपदक पटकावले. आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या प्रार्थना ठोंबरेने साेनल फडके, वासंती शिंदे, मिहिका यादवसोबत संघाला कांस्यपदक मिळवून दिले. पुरुष गटात अनवित बेंद्रे, नितीन किर्तने, शाहबाज खान, आकाश वाघ आणि पूरव राजा यांनी सांघिक गटात कांस्यपदक निश्चित केले.

स्क्वॅश : उर्वशी जोशीला कांस्य
महाराष्ट्राची युवा खेळाडू उर्वशी जोशीने स्क्वॅशच्या महिला गटात कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राचे या खेळ प्रकाराच्या महिला गटातील हे पहिले पदक ठरले. दिल्लीने सुवर्ण उत्तर प्रदेशच्या खेळाडूने रौप्यपदकावर नाव कोरले.

तेजस्विनी, प्रियाल, दीपाली अव्वल
महाराष्ट्राच्या महिला संघाने मंगळवारी सुवर्णपदकाचा वेध घेतला. तेजस्विनी सावंत, प्रियाल केनी आणि दीपाली देशपांडेने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सोनेरी यश संपादन केले. यासह त्यांनी सांघिक गटात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. या गटात हरियाणाला रौप्य आणि पश्चिम बंगालच्या महिला संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
(फोटो : ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र टेबल टेनिस संघाच्या महिला खेळाडू.)