आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 35th National Games: Twin Gold For Jitu Rai, Ronjan Sodhi Win

केरळातील राष्ट्रीय स्पर्धेत राही सरनोबतचा सुवर्णवेध !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - महाराष्ट्र महिला नेमबाज संघ आणि राष्ट्रकुल चॅम्पियन राही सरनाेबतने गुरुवारी ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. राहिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवला. या गटात महाराष्ट्राने दोन पदकांची कमाई केली. यासह आता नेमबाजीत महाराष्ट्राच्या नावे एकूण ९ पदके झाली. यात ६ सुवर्णपदकांचा समावेश आहे. या संघाने स्पर्धेच्या चौथ्या दिवशी ५७ पदकांसह पदक तालिकेत तिसरे स्थान गाठले. यात १८ सुवर्णसह २२ रौप्य आणि १७ कांस्यपदकांचा समावेश आहे.

राहीने अंतिम फेरीत २१.० गुणांची कमाई करताना सुवर्णपदक आपल्या नावे केले. याच गटात नाशिकची श्रेया गावंडे कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिने २०.० गुणांची कमाई केली. या गटात मध्य प्रदेशची सुरभी पाठकने रौप्यपदक पटकावले. तिने १७.० गुणांपर्यंत मजल मारली.

वेदांगी दुसर्‍या स्थानावर : युवा नेमबाज वेदांगी तुळजापूरकरने गुरुवारी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या ५० मीटर थ्री पोझीशन प्रकारात हे यश संपादन केले. तिने अंतिम फेरीत ४४४.७ गुण मिळवले.
महाराष्ट्र हॉकी संघाचा पराभव : महाराष्ट्र महिला हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने महाराष्ट्रावर २-० ने विजयाची नोंद केली. मनमीत कौर (२७ मि.) व गुरप्रीत कौर (३४ मि.) यांनी गोल करून पंजाबला विजय मिळवून दिला.

महाराष्ट्राचे खो-खो संघ चॅम्पियन
नगरची युवा खेळाडू श्वेता गवळीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला खो-खो संघ ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन ठरला. या संघाने अंतिम सामन्यात यजमान केरळच्या महिलांना धूळ चारली. महाराष्ट्राने ११-१० अशा फरकाने फायनलमध्ये विजय मिळवला. यासह महाराष्ट्राचा महिला संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. गुरुवारी महाराष्ट्राने सुवर्णपदकाची लय कायम ठेवली. महाराष्ट्राच्या महिला संघाने अंतिम सामन्यात केरळविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेत्या सारिका काळेने शानदार खेळी करताना महाराष्ट्राच्या विजयात मोलाचे योगदान दिले. श्वेता गवळीनेही उल्लेखनिय कामगिरी करताना संघाला शानदार विजय मिळवून दिला.

महाराष्ट्र पुरुष संघाने केरळला नमवले : महिलांपाठोपाठ महाराष्ट्राच्या पुरुष संघानेही खो-खो खेळ प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. या संघाने अंतिम सामन्यात यजमान केरळला १३-१२ ने पराभूत केले. यासह महाराष्ट्राच्या संघाने जेतेपदावर नाव कोरले. यजमानांना रौप्यवर समाधान मानावे लागले.

दुसर्‍यांदा केरळवर मात
जबरदस्त फॉर्मात असलेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाने अवघ्या २० दिवसांत दुसर्‍यांदा केरळला धूळ चारली. यापूर्वी १३ जानेवारी रोजी रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलमध्ये महाराष्ट्राने केरळचा पराभव केला होता.

तेजस्विनीला रौप्य
औरंगाबादच्या तेजस्विनी मुळेने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तिने हरियाणा संघाचे प्रतिनिधित्व करताना हे यश संपादन केले. महिलांच्या ५० मी. रायफल थ्री पोझीशनच्या सांघिक गटात तेजस्विनी, मीना, अंजुम मौदगीलने हरियाणाला रौप्यपदक मिळवून दिले.

महाराष्ट्र संघटनेने नाकारले
महाराष्ट्राची स्टार नेमबाज तेजस्विनी मुळेला राज्य रायफल शूटिंग संघाने खेळण्यास मज्जाव केल्याने तिने ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेपुरते हरियाणाकडून खेळणे पसंत केले. तेजस्विनी रेल्वेमध्ये नोकरीला असल्याने महाराष्ट्राने तिच्या क्रीडा प्रकाराची निवड चाचणी न घेता संघ जाहीर केला. मला राज्याकडून खेळू द्या, अशी मी संघटनेला विनंती केली होती. परंतु संघटनेने तू रेल्वेत नोकरी करत असल्याने तुला खेळू दिले जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मी दुसर्‍या राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.