अलपुझा/नवी दिल्ली - भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) अलपुझा, केरळ येथील जलतरण प्रशिक्षण केंद्रातील चार महिला खेळाडूंनी विषारी फळे खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. यात एकीचा मृत्यू झाला असून तिघींची प्रकृती गंभीर आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. केंद्रीय क्रीडा मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास होईपर्यंत प्रशिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
१५ वर्षीय जलतरणपटू अपर्णाचा गुरुवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ती नाैकायनात राष्ट्रीय पदक विजेता हाेती. साई होस्टेलमधील वरिष्ठ तिचा शारीरिक छळ करायचे. तसेच दोन िदवसांपूर्वी प्रशिक्षकांनीही तिला लाठीने मारहाण केली होती. त्यामुळे ितला व्यवस्थित बसता िकंवा उभेही राहता येत नव्हते, असा आरोप नातलगाने केला.
‘ओथालंगा’ खाल्ले ?
चारही खेळाडूंनी स्थानिक भाषेत ओथालंगा म्हटले जाणारे विषारी फळ बुधवारी दुपारी खाल्ले. तोंडातून फेस व उलट्या व्हायला लागल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना संध्याकाळी ७ वाजता रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना अलपुझा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे गुरुवारी सकाळी अपर्णाचा मृत्यू झाला.
वरिष्ठांकडून शारीरिक, मानसिक छळ : कुटुंबीय
पुन्नामाडा येथील रहिवासी चारही जलतरणपटू साईच्या वाॅटर स्पोर्ट्स केंद्रात प्रशिक्षण घेत होत्या. त्यांचा वरिष्ठांकडून शारीरिक व मानसिक छळ होत होता. यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यातच, त्यांना कोणी त्रास देत नव्हते, असा खुलासा वसतिगृहाच्या वाॅर्डनने केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची तक्रार दाखल केली आहे.