आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 400 Tests Match News Collection, Pakistan Journalist Kamar Ahamad Record

तब्बल 400 कसोटी सामन्यांचे वृत्तसंकलन,पाकिस्तानी पत्रकार कमार अहमद यांचा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानचे सर्वपरिचित मुक्त क्रीडा पत्रकार, क्रिकेट समीक्षक कमार अहमद उद्यापासून (गुरुवार) शारजा क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणा-या श्रीलंका-पाकिस्तान कसोटी सामन्यादरम्यान एक नवा इतिहास रचणार आहेत. हा त्यांचा 400 वा कसोटी सामना असेल. यापूर्वी असा उच्चांक फक्त ‘द टाइम्स’च्या जॉन वूडकॉक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू, क्रिकेट समालोचक व स्तंभलेखक रिची बेनॉ यांनी केला.
उत्तर प्रदेशमधील मुगलसराई भागात जन्मलेल्या कमार अहमद यांनी 1948 मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतातल्या हैदराबाद येथे वास्तव्य केले होते.त्यांनी हैदराबाद संघाचे नेतृत्वही केले होते. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन आपली मुक्त क्रिकेट पत्रकारिता सुरू केली. ‘दिव्य मराठी’शी बोलताना कमार अहमद म्हणाले, ‘कोणत्याही एका वृत्तपत्र अथवा रेडिओ, टेलिव्हिजन कंपनीसाठी काम न करता गेली 40 वर्षे जगातील सर्वच सर्वमान्य वृत्तपत्र व रेडिओ, टेलिव्हिजन चॅनलवर मी काम करू शकलो, याचा मला अभिमान आहे.
75 वर्षांच्या कमार अहमद यांनी आतापर्यंत 399 कसोटी व 732 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे वृत्तसंकलन केले आहे. बीबीसी उर्दू, हिंदी, इंग्लिश, बीबीसी फाइव्ह लाइव्ह एक्स्ट्रा, एस ए. बीसी रेडिओ, दक्षिण आफ्रिका, टीव्ही एन. झेड. (न्यूझीलंड), ईएसपीएन, टेन स्पोर्टस, रेडिओ पाकिस्तान, ऑल इंडिया रेडिओ, कॅरेबियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, हम एफएम यांच्याकरिता समालोचकाची भूमिकाही बजावली आहे.
गावसकर लाजवाब
सुनील गावसकरांची बंगळुरू कसोटीतील (1987) 96 धावांची लाजवाब खेळी, अ‍ॅशेस मालिकेतील बॉब मेसीचे लॉर्ड्स कसोटीतील 16 बळी, मायकल होल्डिंगच्या ओव्हल-लंडन येथील कसोटीतील 14 विकेट््स, अनिल कुंबळेचे दिल्ली कसोटीतील एकाच डावातील 10 बळी, रिचर्ड हेडलीची सर्वप्रथम 400 बळींची कामगिरी, सहा फलंदाजांचे त्रिशतकी डाव अशा अनेक लक्षात राहणा-या क्रिकेटमधील घटनांचा मी साक्षीदार ठरलो, याचे मला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी कारकीर्दीतील आठवणी सांगताना व्यक्त केली.