आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंड चौथी कसोटी : ओल्ड ट्रॅफर्डवर वर्चस्वासाठी आजपासून रंगणार झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर - भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याला गुरुवारपासून येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरुवात होत आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत असून भारताने दुसरा, तर इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकला होता. तिसर्‍या कसोटीत जेम्स अँडरसन आणि जडेजा यांचा वाद चांगलाच रंगला होता. या वादाला मागे टाकून दोन्ही संघ आता चौथ्या कसोटीवर लक्ष केंद्रित करतील. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांत जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.

भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला हा कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. चौथी कसोटी भारताने जिंकली, तर मालिका गमावण्याची भीती दूर होईल आणि ओल्ड ट्रॅफर्डवरही पहिला विजय मिळवण्यात यश मिळेल. भारताने इंग्लंडविरुद्ध येथे आठ कसोटी सामने खेळले. मात्र, भारताला एकही विजय मिळाला नाही. याउलट इंग्लंडने येथे भारताविरुद्ध तीन विजय आणि पाच सामने ड्रॉ झाले.

गंभीर किंवा धवन?
कर्णधार धोनी सध्या प्रचंड दबावात आहे. मागच्या काही सामन्यांत शिखर धवन, विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. धवनच्या जागी गौतम गंभीर आणि रोहित शर्मा किंवा रवींद्र जडेजाच्या जागी आर. अश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. नेटवर गंभीरने धवनपेक्षा अधिक वेळ सराव केला. यामुळे धोनी गंभीरला संधी देईल, असे संकेत आहेत. रोहित शर्माने साऊथम्पटन कसोटीत चुकीचे फटके मारून निराश केले. दुसरीकडे संघात जडेजाला पूर्णवेळ फिरकीपटू म्हणून जबाबदारी पार पाडता आलेली नाही. यामुळे अश्विनला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. त्याला रोहित किंवा जडेजाच्या जागी संधी मिळू शकते.

कर्णधार कुक, बेलकडून आशा
दुसरीकडे यजमान इंग्लंडला कर्णधार कुक आणि 167 धावांची खेळी करणार्‍या इयान बेलकडून या वेळीही मोठ्या खेळीची आशा असेल. तिसर्‍या कसोटीत पदार्पण करणार्‍या जोस बटलरने 85 धावांची दमदार खेळी करून भारताला घाम फोडला होता.

भारताच्या अडचणी
गोलंदाजीत भारताच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. जखमी असल्यामुळे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चौथ्या कसोटीतही खेळू शकणार नाही. भुवनेश्वर कुमारची टाचसुद्धा दुखावली आहे. संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार भुवनेश्वर खेळू शकतो. अशा परिस्थितीत पंकज सिंग, वरुण अ‍ॅरोन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. क्षेत्ररक्षणातसुद्धा टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. तिसर्‍या कसोटीत विराट व जडेजा यांनी सोपे झेल सोडले.

दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, आर. अश्विन, मो. शमी, वरुण अ‍ॅरोन, पंकजसिंग.

इंग्लंड : अ‍ॅलेस्टर कुक (कर्णधार), गॅरी बॅलेंस, सॅम रॉबसन, इयान बेल, जोस बटलर, जो. रुट, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली, स्टीव्हन फिन, क्रिस जोर्डन, क्रिस वोग्स.