आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे 6 हजार खेळाडूंची उत्तेजक चाचणी होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने (वाडा) लंडन ऑलिम्पिकमध्ये उत्तेजक चाचणीत किमान 6 हजार खेळाडूंची चाचणी घेण्याचे संकेत दिल्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये उत्तेजक चाचणीचाही नवा उच्चांक नोंदवला जाणार आहे. ‘वाडा’चे अध्यक्ष जॉन फाहे यांनी मॉन्ट्रीयल येथून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये घेण्यात येणा-या उत्तेजक चाचणीचे प्रमाण ऑलिम्पिक इतिहासातील चाचण्यांमध्ये सर्वाधिक असेल, असे म्हटले आहे.
लंडन ऑलिम्पिक आयोजन समिती आणि ऑलिम्पिक समिती यांनी लंडन ऑलिम्पिक दरम्यान सुमारे 6250 नमुन्यांची चाचणी करण्याची तयारी ठेवली आहे. संशयित खेळाडूंबद्दलची गुप्त माहिती व अन्य गोष्टींबाबतची देवाणघेवाण ‘वाडा’च्या अधिका-यांनी सुरू केली आहे.
लंडन ऑलिम्पिक उत्तेजकांपासून मुक्त असावे, असा या मोठ्या संख्येत करण्यात येणाºया चाचणीचा ‘वाडा’चा हेतू असल्याचे जॉन फाहे यांनी म्हटले आहे. जॉन फाहे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, यु. के. अँटी डोपिंग एजन्सीला ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होण्याआधी खेळाडूंच्या सरावादरम्यानही उत्तेजक चाचणी घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जगातील अन्य अँटी डोपिंग एजन्सी आणि संस्थांची या कामी माहिती, मदत आणि सहकार्य घेण्यात येत आहे.
लंडन ऑलिम्पिक अधिकाधिक साफ, स्वच्छ प्रतिमेचे असावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. उत्तेजक चाचणीतून सुटण्याची शक्यता कमी असल्याचे खेळाडूंच्या लक्षात यावे, हाही यामागचा हेतू आहे. उत्तेजकांचा आधार घेऊन खेळाडू यशस्वी होऊ शकत नाही. सर्वांना गुंगारा देऊन उत्तेजकांच्या आधारे पदके जिंकणारा खेळाडू आरशात स्वत:ची प्रतिमा पाहू शकणार नाही.