छायाचित्र: आयएसएलमध्ये खेळणा-या आपल्या चेन्नईयन संघातील खेळाडूंसमवेत सिनेअभिनेता अभिषेक बच्चन.
पणजी - पहिल्या सत्रातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा ख-या अर्थाने वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी आयएसएलच्या आयोजकांनीही विविध ठोस पावले उचलून पदोपदी दाखवून दिले आहे.
येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या या फुटबॉल लीगमधील खेळाडूंना प्रथमच विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी आयोजकांनी चक्क खेळाडूंचा ६०० कोटींचा विमा काढला आहे. याशिवाय लीगला २०० कोटींचे विमा संरक्षणही लाभले आहे. फुटबॉल लीगमधील विमा संरक्षणाचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या लीगमध्ये एकूण आठ फ्रँचायझी सहभागी झाल्या आहेत. यातील प्रत्येकी फ्रँचायझीने आपल्या संघातील सर्व खेळाडूंचा ५० ते ६० कोटींचा विमा उतरवला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या विमा पॉलिसीनुसार आता खेळाडूंना वेतन, अपघात, आरोग्याचा लाभ मिळणार आहे. सामन्यादरम्यान होणा-या गंभीर दुखापतीचा खर्च आता फ्रँचायझींना करण्याची गरज नाही. याचा सर्व खर्च हा विमा कंपनी करणार आहे. बीसीसीआयच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या
इंडियन प्रीमियर लीगचा जवळजवळ १,१०० कोटींचा विमा काढला जातो. याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेचा २०० कोटींचा विमा काढण्यात आला होता.
स्वस्तात तिकीट
सर्वसामान्य चाहत्यांना आयएसएलमधील सामन्यांचा आनंद लुटता यावा यासाठी स्वस्त दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणा-या सामन्यांच्या तिकिटांचा दर कमी ठेवण्यात आला आहे. मुंबई फुटबॉल क्लबचे सामने घरच्या मैदानावर आणि पुणे सिटी क्बलचेही सामने या मैदानावर होणार आहेत.