आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरा वनडे; कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेेवर विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- कर्णधार विराट कोहलीच्या दमदार दीड शतक आणि यजुवेंद्र चहल (४ बळी) व कुलदीप यादवच्या (४ बळी)   अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात १२४ धावांनी मोठा विजय मिळवला. सहा सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० ने आघाडी घेतली. भारताने ५० षटकांत ६ बाद ३०३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा ४० षटकांत १७९ धावांवर डाव आटोपला.   


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही फोडू शकला नाही. रबाडाने त्याला चालू दौऱ्यात पाचव्यांदा बाद केले. सलामीवीर शिखर धवन व कर्णधार विराटने दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची शतकी भागीदारी रचली. विराटने १५९ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद १६० धावांची खेळी केली. चौकाराने सुरुवात करणाऱ्या शिखरने अर्धशतक झळकावले. त्याने ६३ चेंडूंत १२ चौकार लगावत ७६ धावा ठोकल्या. त्याला डुमिनीने मार्करामच्या हाती झेलबाद केले. 


त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे अवघ्या ११ धावा करून परतला. त्याने लाँगअॉनवर फेलुकवायोच्या हाती झेल दिला. हार्दिक पांड्याही १४ धावा करून बाद झाला. इम्रान ताहिरने महेंद्रसिंग धोनीला १० धावांवर असताना टिपले. केदार जाधव  (१) मोठी खेळी करू शकला नाही. तेव्हा भारताच्या ६ बाद २३६ धावा झाल्या होत्या.  


शतकी खेळीदरम्यान  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या एक हजार आंतरराष्ट्रीय धावादेखील  पूर्ण केल्या. विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक १२ वे शतक ठोकले. तो भारतीय कर्णधारांच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. कोहली १४१ धावांवर असताना मॉरिसच्या चेंडूवर लाँगऑनमध्ये डेव्हिड मिलरने त्याचा झेल घेतला, मात्र तो चेंडूसह सीमारेषेचा बाहेर गेल्याने षटकार झाला. कोहलीने अखेरच्या २ चेंडूंवर षटकार व चौकार खेचत संघाला ३०० धावांचा टप्पा गाठून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या डुमिनीने ६० धावांत २ गडी बाद केले. इम्रान ताहिर, रबाडा, मॉरिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.  

 

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १७९ धावा 
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव ४० षटकांत १७९ धावांवर संपुष्टात आला. यात मार्करामने ४२ चेंडूत २ चौकार व एक षटकार खेचत ३२ धावा काढल्या.  हेनरीकचे पदार्पण चांगले झाले नाही. तो ६ धावांवर असताना चहलने त्याला पायचीत केले. सलामीवीर हाशिम अमला एका धावेवर परतला. डुमिनीने संघर्ष करत ६७ चेंडूत ४ चौकारांसह ५१ धावा केल्या. डेव्हिड मिलरने २५  धावा केल्या. फिरकीपटू यजुवेंद्र चहलने ४६ धावांत ४ आणि कुलदीप यादवने २३ धावांत ४ गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. 

 

कोहलीला जीवनदान; ३४ वे शतक साजरे   
कोहलीने खातेही उघडले नव्हते तेव्हा रबाडाच्या चेंडूवर अंपायरने त्याला पायचीत बाद दिले. मात्र, भारतीय कर्णधाराने डीआरएसचा आधार घेतला. यात कोहलीला जीवनदान मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना कोहलीला मालिकेतील सलग दुसऱ्या शतकापासून रोखता आले नाही. कोहलीने आपले ३४ वे शतक साजरे केले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...