चेन्नई - बुधवारपासून भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात दुस-या चारदिवसीय कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळणार आहे. कोहलीच्या कामगिरीवरच सर्वांचे लक्ष असेल.
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी सरावासाठी कोहलीने या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने सोमवारीसुद्धा सराव केला होता. पहिली कसोटी ड्रॉ सुटली होती. येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी संथ आणि कडक होती. यामुळे तेथे सामन्याचा निकाल लागला नाही. मात्र, या वेळी भारतीय अ संघाला अधिक चांगल्या खेळपट्टीची आशा आहे. भारतीय गोलंदाजांत फायदेशीर ठरेल, अशा खेळपट्टीची आशा भारताला आहे. ही खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना आणि नंतर फिरकीपटूंना मदत करेल, असे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सांगितले. यामुळे सामन्यात चेंडू आणि बॅट यांच्यात चांगली झुंज रंगेल, अशी चिन्हे आहेत.