आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुण्यांसाठी केलेल्या खड्ड्यात भारतीय संघ स्वत:च पडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खराब खेळपट्टीमुळे नागपूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आयसीसी आणि बीसीसीआय या दोन महत्त्वाच्या संघटनांचे प्रमुख असलेल्या शशांक मनोहर यांच्या क्रिकेट संघटनेवर दक्षिण आफ्रिका-भारत कसोटी मालिकेतील खेळण्यास अयोग्य खेळपट्टी असा शिक्का आयसीसीने मारला होता. भारतीय संघ व्यवस्थापनाचे फाजील लाड करणाऱ्या नागपूर क्रिकेट संघटनेने त्यापासून काहीच धडा घेतलेला दिसत नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यासाठी २० षटकेही फलंदाजी करता येणार नाही अशी खेळपट्टी तयार केली. खेळपट्टीवर पाहुण्यांना लोळवण्याऐवजी भारतीय संघ स्वत:च कोसळला.

आयसीसीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी भारतात होणाऱ्या विश्वचषकात फलंदाजीसाठी पोषक खेळपट्ट्या तयार करण्याची ग्वाही दिली होती. आयसीसीचे आदेश बासनात गुंडाळून न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाजदेखील कर्दनकाळ वाटावेत अशी खेळपट्टी नागपुरात तयार केली गेली. न्यूझीलंडने, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट या आपल्या वेगवान गोलंदाजांना विश्रांती देऊन सॅन्टनर, सोधी या नवोदित फिरकी गोलंदाजांना खेळवले. भारताच्या फिरकी गोलंदाजांपेक्षाही हे नवोदित फिरकी गोलंदाज भेदक वाटले. त्यांनी ९ बळी घेतले. याचे कारण आपल्या संघ व्यवस्थापनानेच ‘रँक टर्नर’ची फर्माईश केली होती असे कळते. आश्चर्याची गोष्ट अशी की,भारत-पाक सामना होणार होता त्या धर्मशाला येथेही फिरकीला पोषक करण्याचे डावपेच लढवले गेले होते, अशी खात्रीलायक माहिती आहे.
सुमार पिचचा फटका..
वानखेडेच्या खेळपट्टीवर आगपाखड करणाऱ्या शास्त्री आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तशाच खेळपट्ट्यांवर गेल्या १३ सामन्यांपैकी ११ सामने जिंकले होते आणि ज्या दोन लढती (पुणे व नागपूर) भारताने गमावल्या तेथील खेळपट्ट्या खराब ठेवण्यात आल्याचा फटका आपल्यालाच बसला. आता तरी भारतीय संघ व्यवस्थापन शहाणे होईल का?
बातम्या आणखी आहेत...