आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी भारतीयांच्या उड्या; रवी शास्त्री, संदीप पाटील उत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी भारतीय आणि परदेशी अशी एकूण ५७ जणांनी अर्ज केले असले तरीही त्यापैकी प्रत्यक्षात किती जणांनी पात्रता निकष पूर्ण केला आहे याबाबत शंका आहे.

याबाबत बीसीसीआय सचिव अजय शिर्के यांनी स्पष्ट केले आहे की, उद्या (मंगळवार) अर्जांची छाननी केल्यानंतर लायक उमेदवारांचेच अर्ज क्रिकेट सल्लागार मंडळाकडे पाठवण्यात येतील. मात्र, या सल्लागार मंडळावरील नव्या सदस्यांची नियुक्ती अद्याप व्हायची आहे.
क्रिकेट संघाच्या प्रशिक्षणपदासाठी दाखल झालेल्या अर्जांमध्ये काही नामवंत क्रिकेटपटूंचीही नावे आहेत. भारतीय संस्कृतीची जाण असणारा क्रिकेट प्रशिक्षक हवा असे विधान धोनीने केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनाही महत्त्व आले आहे. परदेशी प्रशिक्षकांमध्ये जेसन गिलेस्पी, स्टुअर्ट लॉ, इयान फ्लेमिंग, व्हेट्टोरी आदींच्या नावांची चर्चा आहे. यापैकी विराट कोहली याने व्हिट्टोरीची शिफारस केली होती तर धोनीने दोन वर्षांपासूनच फ्लेमिंगच्या नावाचा ध्यास धरला होता.
रवी शास्त्री, संदीप पाटील उत्सुक
टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, संदीप पाटीलदेखील उत्सुक अाहेत. यांनीदेखील अर्ज दाखल केले अाहेत. रवी शास्त्री यांनी गेले वर्षभर संचालकपदावर काम केले आहे. पाटील हे सध्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष आहेत.