नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीमध्ये माजी कर्णधार राहुल द्रविडही असेल, तर भारतीय संघाला आणखी फायदा होईल, असे मत टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
येथे कार्यक्रमाला अाला असता पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला, "सल्लागार समितीमध्ये द्रविडसुद्धा असेल तर आणखी चांगले होईल. सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुलीसोबत द्रविड असणे टीम इंडियाच्या फायद्याचे ठरेल. बहुदा द्रविड आणखी काही कामात व्यग्र असेल. यामुळे सल्लागार समितीमध्ये ते सामील झाले नाहीत.'
भारतीय भिंत राहुल द्रविड सल्लागार समितीमध्ये नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सल्लागार समितीमध्ये द्रविड नसल्याचे कारण काय तसेच बीसीसीआय द्रविडच्या हाती वेगळी जबाबदारी देणार आहे काय, हेसुद्धा अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
धोनीकडून शिकणार
कर्णधाराने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवताना त्यांना मैदानावर जगजाहीर करू नये, हे महत्त्वाचे असते. मला माझी याबाबतची सवय दुरुस्त करायची आहे. धोनी मैदानावर शांत असतो. ही कला मी धोनीकडून शिकणार आहे, असे कोहली म्हणाला.