आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य, भारत-श्रीलंका यांच्यात तिसरी कसोटी आजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - दुसऱ्या कसोटीत कात टाकल्याप्रमाणे खेळणाऱ्या टीम इंडियासमोर शुक्रवारपासून श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयाचे आव्हान असेल. दुसरी कसोटी जिंकल्यानंतर भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. विराट सेना सिंहलीज स्पोर्ट्स मैदानावर पुन्हा अॅक्शनमध्ये असेल. श्रीलंकेच्या भूमीवर भारताला मागच्या २२ वर्षांपासून मालिका जिंकता आलेली नाही. तिसरी कसोटी जिंकून ऐतिहासिक मालिका विजयासाठी विराट सेना सज्ज झाली आहे. तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांकडून जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेसाठी कुमार संगकारा या सामन्यात नसेल. दुसऱ्या कसोटीनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दोन्ही कसोट्यांत आपले वर्चस्व राखले. पहिल्या कसोटीच्या सुरुवातीचे तीन दिवस भारताने वर्चस्व राखल्याने चौथ्या दिवशी सुमार फलंदाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने चुका टाळून विजयाचा मार्ग सुकर केला. पी. सारा ओव्हल मैदानावर भारताने जबरदस्त पुनरागमन करताना २७८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी केली.

भारतीय संघात बदल अपेक्षित
दुसरी कसोटी जिंकणाऱ्या भारतीय संघात बदल होतील. सलामीवीर मुरली विजय आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहा जखमी होऊन मालिकेबाहेर झाले आहेत. शिखर धवनही आधीच मालिकेबाहेर आहे. टीम इंडियात करुण नायर आणि नमन ओझा हे युवा खेळाडू सामील झाले आहेत. मुरली विजय मालिकेबाहेर झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराला सलामीला खेळवण्याचा निर्णय शक्य आहे. तसे संकेत विराट कोहलीने आधीच दिले आहेत. पुजारा सलामीला लोकेश राहुलसोबत खेळू शकतो. विजयच्या जागी पुजारा खेळू शकतो आणि साहाच्या जागी नमन ओझा यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करू शकतो, अन्यथा लोकेश राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

गोलंदाजीत बदल नाही
ऑफस्पिनर आर. अश्विन आणि लेगस्पिनर अमित मिश्रा यांनी मालिकेत आतापर्यंत २९ विकेट घेतल्या आहेत. यामुळे गोलंदाजीत बदलाची शक्यता कमीच आहे. वेगवान गोलंदाजीत ईशांत शर्मा, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी यांचे प्रदर्शन समाधानकारक होते. यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीत बदलाची शक्यता नाही.

श्रीलंकेतही आहे दम
यजमान श्रीलंकेच्या सर्व आशा त्यांचा डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथ याच्यावर आहेत. पहिल्या कसोटीत त्याने दमदार प्रदर्शन केले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीत तो पूर्णपणे अपयशी ठरला. दुसरीकडे श्रीलंकेच्या फलंदाजांना भारताच्या फिरकीसमोर टिकून खेळावे लागेल. संगकाराच्या निरोपाच्या कसोटीनंतर आता निर्णायक सामन्यात दम दाखवाला लागेल. यजमान संघाच्या फलंदाजीची मदार अँज्लो मॅथ्यूज, करुणारत्ने, दिनेश चांदिमल यांच्यावर असेल.

दोन्ही संभाव्य संघ
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कौशल सिल्वा, उपुल थरंगा, लाहिरू थिरिमाने, दिनेश चांदिमल, कुशल परेरा, धम्मिका प्रसाद, रंगना हेराथ, कौशल, डी. परेरा, नुवान प्रदीप.
भारत : विराट कोहली (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, करुण नायर, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, नमन ओझा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, उमेश यादव.

भारताचा एकच विजय
सिंहलीज मैदानावर भारत-श्रीलंका यांच्यात सात कसोटी सामने झाले आहेत. यातील चार कसोटी सामने ड्रॉ झाले, तर भारताने एक सामना जिंकला. दोनमध्ये भारताचा पराभव, श्रीलंकेचा विजय झाला. दोन्ही संघांत जुलै २०१० मध्ये येथे झालेला अखेरचा सामना ड्रॉ झाला होता. श्रीलंकेने येथे वर्षापूर्वी पाकला नमवले होते.