आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाला धक्का देण्याची इंग्लंड संघाची जोरदार तयारी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका ३-० अशी जिंकली असली तरीही दिवाळीनंतर सुरू होणारी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका यजमानांची झोप उडविणारी ठरणार आहे. २०१२ च्या भारत दौऱ्यात पहिली कसोटी गमावल्यानंतरही इंग्लंडने भारताला भारतात २-१ असे पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. त्या वेळी भारताकडे सचिन, सेहवाग, धोनी, हरभजन यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असतानाही इंग्लंडने यजमान भारताला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला होता.

तोच इंग्लंड संघ त्याच धूर्त कप्तान अॅलेस्टर कुकच्या नेतृत्वाखाली भारतात खेळण्यासाठी येत आहे. गत दौऱ्याच्या अनुभवावरून इंग्लंड संघाने आपल्या संघात फिरकी गोलंदाज घेतले असून आणखी एका फिरकीपटूचा समावेश करण्याचा ते विचार करीत आहे.

भारताला इशारा
इंग्लंडच्या दृष्टीने त्यापेक्षाही मोठी जमेची बाजू म्हणजे हा संघ सध्या भारताशेजारच्याच बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. तेथे फिरकीला पोषक आणि आखाडा खेळपट्ट्यांवर हा संघ यजमानांना पुरून उरला आहे. बांगलादेश संघ आता पूर्वीप्रमाणे कच्चा लिंबू नाही. विशेषत: त्यांच्याकडे फिरकी गोलंदाज अप्रतिम आहेत. जे भारतीय संघालाही आता जेरीस आणतात. त्या संघाविरुद्ध पहिली कसोटी जिंकून इंग्लंडने भारतालाच इशारा दिला आहे.

भारताचा डाव उलटू शकतो
खराब खेळपट्ट्या केल्यास तो डाव भारतावरही उलटू शकतो, असा तो इशारा आहे. इंग्लंड संघाने आणखी एक गोष्ट शहाणपणाची केली आहे. त्यांनी पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक याला आपल्या फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शनासाठी पाचारण केले आहे. ‘दुसरा’ या जगप्रसिद्ध चेंडूचा जनक असणारा सकलेन धूर्त चाणाक्ष आहे. भारतीय फलंदाजांचे कच्चे दुवे त्याला आधीपासूनच ज्ञात आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर कशी गोलंदाजी करायची याचे प्रशिक्षण त्याने इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना बांगलादेशातच द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच बांगलादेश संघ ऐन मोक्याच्या वेळी कोसळला इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली.

बांगलादेशदौऱ्याचा फायदा
इंग्लंडने चुरशीची एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली. दोन कसोटी सामन्यांमुळे इंग्लंडला भारताच्या दौऱ्याआधी आवश्यक असलेला सरावही मिळाला आहे. बांगलादेशसारख्या उत्तम फिरकी गोलंदाज असणाऱ्या संघाविरुद्ध खराब खेळपट्ट्यांवर खेळल्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना महत्त्वाचा सराव मिळाला आहे, जो भारताच्या दौऱ्यावरील सराव सामन्यात मिळाला नसता. त्यांचे बेन स्टोक्स, डकेट, ज्यो बटलर, मोईन अली स्वत: कुक यांना फिरकीविरुद्ध खेळण्याचा अप्रतिम सराव मिळाला आहे. इंग्लंड संघातील फिरकीपटू सुद्धा भारताविरुद्ध खेळण्यास आतूर झाले आहेत.
इंग्लंडकडे कुकच्या रूपाने भारतीयांची कोंडी करण्यासाठी धूर्त कप्तान आहे. इंग्लंडकडे कूक, स्टोक्स, रूट, बटलर, बेयरस्ट्रो हे खडूस फलंदाज आहेत. नवोदित डकेट बॅलन्स यांनीही भारतीय उपखंडात आपण खेळू शकतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत आपण जसे बाजी पलटवू शकलो तसे करणे इंग्लंडविरुद्ध मालिकेत सोपे नाही.

भारतीय व्यवस्थापन आतापासून आहे चिंतेत
भारतीय व्यवस्थापन दुहेरी समस्येत सापडले आहे. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा यांना पोषक खेळपट्टी तयार केली तर त्याचा लाभ घेण्यासाठी इंग्लंडकडेही तेवढ्याच तयारीचे फिरकी गोलंदाज आहेत. मोईन अलीबाबत भारतीयांना अजूनही अचूक अंदाज आला नाही. अब्दुल रशीदही भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतो. हसीब हमीद, झफर अन्सारीही फिरकीची आहे. त्यामुळे गत भारतीय दौऱ्यात जसा माँटी पानेसर जसा अनपेक्षित धक्का देऊन गेला तसेच या दौऱ्यात संभवण्याचा धोका आहे. न्यूझीलंडने भारतीय फलंदाजांच्या मर्यादा उणिवा दाखवून दिल्या होत्या. त्यांच्याकडे नियमित कसोटी फिरकी गोलंदाज नव्हते. नाही तर भारताचीही पंचाईत झाली असती.
बातम्या आणखी आहेत...